मुंबई - केंद्र सरकारने परदेशातील प्रवाशांवरही निर्बंध घातले आहेत. त्याचा फटका फिलिपाइन्समध्ये शिकण्यासाठी गेलेल्या ५० विद्यार्थ्यांनाही बसला आहे. या विद्यार्थ्यांनी फिलिपाइन्सवरून भारताच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र, सिंगापूर विमानतळावर आल्यावर त्यांना भारताच्या दिशेने जाणाऱ्या विमानात बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले आहेत. त्यातील एक विद्यार्थिनी अंबरनाथची असून तिच्या पालकांनी या विद्यार्थ्यांना भारतात सुखरूप आणण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे.
नेहा पाटीलसह इतर विद्यार्थी हे फिलिपाइन्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले होते. मात्र, तेथेही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांनी त्या देशातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्या सरकारनेही त्यांना भारतात जाण्याची परवानगी दिली. मात्र, मनिला विमानतळावरून थेट भारतासाठी विमान नसल्याने मनिला ते मलेशिया आणि नंतर मलेशिया ते भारत असा त्यांचा प्रवास होता. त्यानुसार, ते १७ मार्चला ते मनिलाहून मलेशियात दाखल झाले. मात्र, मलेशिया सरकारने त्यांच्या देशातून थेट भारतात पाठविता येणार नाही, असे स्पष्ट करत त्यांना सिंगापूरला पाठवले.
हेही वाचा - एसीचा वापर टाळा, राज्य सरकारचे तातडीचे परिपत्रक
सिंगापूरहून एअर इंडियाच्या विमानाने ते भारतात दाखल होणार होते. मात्र, सिंगापूर सरकारला मिळालेल्या आदेशानुसार त्यांना सिंगापूरहून भारतात पाठविता येणार नाही, असे स्पष्ट केले. या विद्यार्थ्यांनी पालकांना त्याची कल्पना दिली. फिलिपाइन्समधील 'प्रीज्वल हेल्थ सिस्टीम डाटा' या कॉलेजमध्ये नेहा एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांची प्राथमिक तपासणी स्वत:च केली आहे. ते वैद्यकीय शिक्षण घेत असल्याने त्यांना त्याची जाणीव असून, त्यांच्यातील अजून एकही विद्यार्थी कोरोनाने बाधित नाही. त्यामुळे केंद्राने त्या विद्यार्थ्यांना लवकर भारतात आणावे, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सरकारकडे केली होती.
सिंगापूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मुंबईत सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वतः सिंगापूर मधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्कात आहेत. सिंगपूरमधील विद्यार्थ्यांची दूतावास काळजी घेणार असं त्यांनी सांगितलं, तसेच विद्यार्थिनी बोडस हिच्याशी मुख्यमंत्र्यांनी बोलून धीर दिला आहे.
हेही वाचा - 'कोरोना विषाणू शहरात आला अन् आमचे काम घेऊन गेला!'