मुंबई : राज्य वन्यजीव मंडळावर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री स्वत: या मंडळाचे अध्यक्ष तर वन मंत्री संजय राठोड उपाध्यक्ष आहेत.
या मंडळाच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, तसेच विधानसभा सदस्य धीरज देशमुख यांचा समावेश आहे. तर वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट, इकोप्रो संस्था, चंद्रपूर या संस्थांचे प्रतिनिधी असतील. याशिवाय अशासकीय सदस्यांमध्ये अनुज खरे (पुणे), विश्वास काटदरे (रत्नागिरी), बिट्टू सहगल( मुंबई), किशोर रिठे (अमरावती), पूनम धनवटे, कुंदन हाते (नागपूर), यादव तरटे पाटील, सुहास वायंगणकर (कोल्हापूर) यांचा या मंडळात समावेश आहे.
या मंडळावर अपर मुख्य सचिव वने, प्रधान सचिव आदिवासी विकास, प्रधान मुख्य वन संरक्षक( वन बल प्रमुख), व्यवस्थापकीय संचालक, पर्यटन महामंडळ, आयुक्त पशुसंवर्धन, मत्स्यविकास, पोलीस महानिरीक्षक पदाहून कमी दर्जाचा नसलेला अधिकारी, सैन्यदलाचा प्रतिनिधी, केंद्रीय पर्यावरण व वन विभागाच्या संचालकांचा प्रतिनिधी, भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून, बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे प्रतिनिधीदेखील सदस्य म्हणून आहेत. राज्य वन्य जीव मंडळ हे उपवने, अभयारण्ये, शिकार स्थाने, बंदिस्त क्षेत्रांच्या बाबतीत राज्य सरकारला सल्ला देणे, वन्य प्राणी यांचे जतन व संरक्षण, लायसेन्स व परवाना देण्याबाबत धोरण ठरविणे ही कर्तव्ये मंडळामार्फत बजावली जातात.