मुंबई - भाजपसोबत युती का केली? याचे कारण सांगतो, आम्हाला बारामती सकट सगळा महाराष्ट्र जिंकायचा आहे. आम्हाला फक्त गिरीश महाजन द्या, अशी विनंती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजपसाठी मेजवानीचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते.
एकीकडे भाजपचे मित्र पक्ष नाराजी व्यक्त करण्यासाठी शेजारीच महादेव जानकर यांच्या बंगल्यात जमले असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री शिवसेना, भाजपच्या आमदारांना दिलेल्या खास मेजवानीत व्यस्त होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मार्गदर्शनात भाजपचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचे तोंडभरून कौतुक केले. निवडणूक जिंकायच्या असतील तर महाजन यांच्याशिवाय पर्याय नाही, असे उद्धव ठाकरे म्हणताच उपस्थितांमध्ये एकाच हशा पिकला.
मुख्यमंत्र्यांनी नाशिक, धुळे आणि जळगाव महानगर पालिका निवडणुकांची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे दिली होती. या तिन्ही निवडणुकीत महाजन यांचे नेतृत्व आणि कला कौशल्य साऱ्या महाराष्ट्राने पाहिले. अलीकडेच झालेल्या धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीत तर जेवढ्या जागा महाजन यांनी सांगितल्या तेवढ्या जागा भाजपने जिंकल्या. भाजपचे आमदार अनिल गोटे यांना मोठा धक्का बसला. गोटे यांनी तर महाजन यांनी नव्या तंत्राने ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा आरोप केला होता. महाजन यांच्या कर्तृत्वावर आता उद्धव ठाकरे ही फिदा झाले असून त्यांनी थेट महाजन आम्हाला द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.