मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार देशात महायुतीला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातही सेना-भाजप युतीने मुसंडी मारली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही जनतेमध्ये राहतो. त्यामुळे जनतेची नाडी आम्हाला माहित आहे. जनतेमध्ये गेल्यानंतर देशातील गरिबांमध्ये, शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोदींजी बद्दल प्रेम होते, विश्वास होता. त्यामुळे लक्षात येत होते की जनता आम्हालाच मतदान करणार आहे हे लक्षात येत होते. त्याच बरोबर युतीने राज्यात केलेल्या कामाची ही पावती असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
राहुल गांधी वर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की राहुल गांधी रोज खोटे बोलात होते. कोर्टाची दिशाभूल करत होते. मात्र, ते जनतेला समजते त्यामुळे जनतेने या मतदानातून दाखवून दिले असल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. तसेच मनसे अध्य़क्ष राज ठाकरेंची भाषणे ही विसंगत आणि खोटी होती, ते शेवटच्या क्षणी शेलारांनी जनतेला दाखवून दिले असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
शिवसेना गेल्या ३० वर्षापासून आमच्यासोबत आहे. आमची युती मुद्द्यावर मतभेद होते ते दूर केले. मात्र, आम्ही देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही युती केली आहे आणि ती विधानसभा निवडणुकीतही राहणार, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.