मुंबई CM Eknath Shinde On MLA Disqualification Result : आमदार अपात्र निकालानंतर आता सर्व राजकीय पक्षातून प्रतिक्रिया समोर येत असताना, आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 2019 मध्ये शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या राज्यातील लाखो मतदारांचा आज विजय झाला आहे. त्यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन केलं. आज लोकशाहीचा पुन्हा एकदा विजय झाला, अशी निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिला प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदुत्ववादी विचारांचे आम्हीच खरे वारसदार : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन निघालेल्या शिवसैनिकांचा हा विजय आहे. बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आजचा विजय हा सत्याचा विजय आहे. अत्यंत पुरोगामी आणि राजकीय नेत्यांना जबाबदारीचं भान देणारा हा निकाल आहे. मतदारांच्या मताचा सन्मान करणारा आणि लोकशाहीत त्यांचा निर्णयाधिकार अबाधित ठेवणारा हा निकाल आहे, असं मुख्यमंत्र्यांनी निकालावर म्हटलंय.
निकाल एका पक्षाचा विजय नसून लोकशाहीचा : निवडणुकीतील युतीशी फारकत घेत, सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन करण्याची प्रवृत्ती लोकशाहीला मारक ठरणारी होती. आजच्या निकालानंतर तसे प्रकार थांबतील. आजच्या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आजचा निकाल हा कुणा एका पक्षाचा विजय नसून, भारतीय संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय आहे. लोकशाहीमध्ये नेहमी बहुमताला महत्त्व असतं. शिवसेना हा मूळ पक्ष अधिकृतपणे निवडणूक आयोगाने आमच्याकडं दिला आहे आणि धनुष्यबाणही आमच्याकडे दिलं आहे.
अनैसर्गिक आघाड्या करणाऱ्यांना धडा : पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिलं आहे. लोकशाहीत राजकीय पक्षही लोकशाही पद्धतीनेच चालला पाहिजे, पक्षाध्यक्ष सुद्धा मनमानी करू शकत नाही, हे या निकालाने दाखवून दिलं आहे. सत्तेसाठी विचारांची मोडतोड करू, अनैसर्गिक आघाड्या करून आणि विश्वास पायदळी तुडवून त्यावर ताठ मानेने उभे राहण्याचा घोर अपराध करणाऱ्या नेत्यांना या निकालाने धडा दिला आहे, असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेना लगावला.
हेही वाचा -