मुंबई : शिंदे गटाने आज राज्यातील वृत्तपत्रांत 'राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी पूर्ण पान भर जाहिरात दिली. या जाहिरातीत एका सर्वेचा दाखला देत, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून 26.1 टक्के आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के लोकांची पसंती असल्याचे म्हटले आहे. मात्र या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दिसत नाही. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो देखील लावण्यात आलेला नाही. विरोधकांनी यावरून शिंदे गटावर टीकास्त्र सोडत भाजपला खोचक टोले लगावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता यावर स्पष्टीकरण दिले आहे. फोटो असो किंवा नसो, लोकांच्या मनात आम्हीच असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
'आम्ही लोकांच्या मनात आहोत' : एकनाथ शिंदे म्हणाले की, 'राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली डबल इंजीन सरकार काम करत आहे. राज्यातील मोठ्या विकास प्रकल्पांना केंद्रांकडून निधी मिळतो आहे. आर्थिक पाठबळ देखील मिळत आहे. महाविकास आघाडीच्या काळात रखडलेले प्रकल्प यामुळे मार्गी लागत आहेत. आम्ही घरातून नव्हे तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करत आहोत. सर्वसामान्य माणसाला हवा असलेला विकास यामुळे साध्य होतो आहे. मुंबईला विकासाभिमुख करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. या पार्श्वभूमीवर आलेला हा सर्वे जनतेच्या मनाची पसंती दर्शवतो. जाहिरातीत आमचा फोटो असेल किंवा नसेल, मात्र आम्ही दोघेही लोकांच्या मनात आहोत. हे महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट करत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
'आघाडी सरकारच्या निर्णयाची युतीत अंमलबजावणी' : मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'राज्यात अतिवृष्टीमळे झालेल्या नुकसानीकरिता दुप्पट मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर क्षेत्राला मदत मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 50 हजारपर्यंत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली होती. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल', असे ते म्हणाले.
जाहिरातीवरून अजित पवारांची टीका : मुख्यमंत्र्यांच्या या जाहिरातीवर विरोध पक्ष नेते अजित पवार यांनी टीका केली आहे. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी या जाहिरातीने स्वत:चे हसे केले आहे. या जाहिरातीवर बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघेंचा फोटो नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो सोईस्कररित्या वगळला आहे. मुख्यमंत्री बाळासाहेबांना इतक्या लवकर कसे विसरले?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शिंदे बाळासाहेबांना कसे विसरले असा सवाल केला आहे. तसेच या जाहिरातीवरुन राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.
हे ही वाचा :