मुंबई : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. त्यांना दिलासा देत सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.
मुख्यमंत्र्यांचा दूरध्वनीवरून संपर्क : मणिपूरमध्ये काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा भडकली असून अजूनही धुमसत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झालाआहे. मणिपूरमध्ये या हिंसाचारामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहे. यातील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना आश्वस्त केले. त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
विशेष विमानाची व्यवस्था : विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतल्यावर या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लवकरच हे विमान या अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात येईल. राज्य शासन मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मदत करण्याची विनंती राज्य सरकारला केली होती. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूरमधील विद्यार्थ्यांना सुखरुप आणण्यासाठी उपायोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते.
कशी आहे मणिपूरमध्ये परिस्थिती : मणिपूरमध्ये दोन जातीय गटामध्ये हिंसाचार भडकल्याने 54 जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी, इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही हिंसाचार आटोक्यात न आल्याने पाहता क्षणाची गोळ्या झाडण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने मणिपूर पोलिसांनी दिले आहेत. मणिपूरमधील परिस्थिती निवळत असून काही ठिकाणी काही तासापुरती संचारबंदीचे निर्बंध शिथील केले होते.
मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.