मुंबई - सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी एक वादग्रस्त विधान केले होते. यावरून अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. भाजप, शिवसेना यांनी या विधानाचा विरोध केला होता. मुख्यमंत्री शिंदे देखील या विधानानंतर आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तसेच त्यांनी आज त्यांचे सर्व सोशल मीडिया हॅडलचे प्रोफाईल फोटो देखील बदलले आहेत. 'आम्ही सारे सावरकर' अशा आशयाचे कॅप्शन असलेले फोटो शिंदेंनी प्रोफाईला ठेवले आहे.
मुख्यमंत्र्यांनी बदलला डीपी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व सोशल मीडिया प्रोफाईलवर आतापर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव असलेला फोटो होता. सावरकरांच्या मुद्द्यानंतर शिंदे आता आणखी आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी चक्क ट्विटर, फेसबुकच्या प्रोफाईल फोटोमध्ये बदल केला आहे. आम्ही सारे सावरकर अशा आशयाचे प्रोफाईल मुख्यमंत्री शिंदे यांनी ठेवले आहे.
सावरकर गौरव यात्रा काढणार - सावरकरांबद्दलच्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राहुल गांधी यांचा निषेध म्हणून आणि सावरकर यांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेतून केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे. सावरकरांवरील विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांनी या विषयात उडी घेतली आहे.
गांधींचे विधान अन् ठाकरेंची तोफ - माफी मागायला मी सावरकर नाही, मी गांधी घराण्यातला आहे, असे वादग्रस्त विधान माजी खासदार राहुल गांधी यांनी बोलताना केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेतून राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला होता. सावरकर हे आमचे दैवत असुन, त्यांचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना सुनावले होते. तर दुसरीकडे नाना पटोले यांनीही यावर आपले मत मांडले आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसची भूमिका मांडली असल्याचे नाना पटोले म्हणाले.