मुंबई : नाशिकवरून जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या हजारो आंदोलक शेतकऱ्यांशी उद्या (बुधवारी) चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी आज सभागृहात दिली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.
मोर्चा धडकणार : भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी मुंबईकडे विधान भवनावर मोठा मोर्चा घेऊन येत आहेत. वन जमिनीच्या प्रमुख प्रश्नांसह शेतीमालाला रास्त भाव, शालेय पोषण आहार कर्मचारी ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा प्रश्न ग्रामरोजगार सेवकांचा प्रश्न पोलीस पाटील तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रश्नासह अनेक प्रश्नांसाठी हा मोर्चा निघाला आहे.
सभागृहात मुद्दा: दिंडोरीहून निघालेल्या या शेतकरी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी वेळ दिलेली नाही. त्यामुळे तातडीने या आंदोलकांशी चर्चा करावी. हजारो आंदोलकांना उन्हातान्हातून मुंबईत यावे लागत आहे, या संदर्भात सभागृहांनी तातडीने सरकारने कार्यवाही करून त्यांची दखल घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली.
आजची बैठक रद्द : मंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात सांगितले की, आंदोलकांशी चर्चा सुरू असून हे आंदोलन सध्या इगतपुरी पर्यंत आलेले आहेत. त्यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांनीही सांगितले ज्यावेळेस मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा होईल तेव्हा मोर्चा थांबवला जाईल. त्यामुळे या आंदोलन शेतकऱ्यांसोबत बुधवारी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात दिली.
बैठक निष्फळ : दरम्यान, शेतकऱ्यांचा लॉंगमार्च नाशिकहून रवाना होण्यापूर्वी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मंत्री दादा भुसेंनी केलेली चर्चा निष्फळ ठरली होती. परिणामी या बैठकीत तोडगा निघू शकला नव्हता. पालकमंत्र्यांसोबत तब्बल 4 तास बैठक होऊनही मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलक आंदोलनावर ठाम होते. आज हा लाँगमार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला. नाशिकहून निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी आणि आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे कोणत्याच शहरातील सामान्य माणसाला त्रास होणार नाही, असा शब्द आंदोलकांनी दिला आहे. शिवाय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा मुंबईत धडकणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.