मुंबई - शहरातील जुहू चौपाटीवर क्लिन अप मार्शल आणि पर्यटकांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. यावर, क्लिन अप मार्शल गुंडगिरी करत होता, असा पर्यटकांचा आरोप आहे. या मार्शलवर करवाई करण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे. राडा झाल्याची ही घटना नवीन नसून यापूर्वी देखील अशी एक घटना झाली आहे.
हेही वाचा - दिलासा नाहीच, आज पुन्हा 6281 नवे रुग्ण; अमरावतीत मुंबईपेक्षा अधिक रुग्ण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नागरिकांनी मास्क घालणे गरजेचे आहे. मास्क न घालणाऱ्यांवर करावाई करण्यासाठी पालिकेतर्फे क्लिन अप मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर क्लिन अप मार्शलने आज जुहू बीचवर मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. यावेळी दंड आकारल्याने क्लिन अप मार्शल आणि नागरिकांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाल्याचे समोर आले. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महानगरपालिका किंवा मुंबई पोलिसांनी या क्लिन अप मार्शलवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.
क्लिनअप मार्शलला प्रशिक्षण
दरम्यान, मुंबईत मास्क न घालणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्यासाठी क्लिनअप मार्शल नेमण्यात आले आहे. मात्र, हे क्लिन अप मार्शल नागरिकांना मारहाण करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यावर उपाय म्हणून क्लिन अप मार्शलला नागरिकांशी कसे वागायचे, कसे बोलायचे याचे प्रशिक्षण दिले जाईल, असा खुलासा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला होता.
मुंबईत जुहू येथे मास्क न लावणाऱ्या नागरिकांना क्लिन अप मार्शलकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना किशोरी पेडणेकर यांनी खुलासा केला होता. मारहाणीचे प्रकार समोर येत असल्याने मारहाण करणारे क्लिन अप मार्शल खरे आहेत का, ते पाहिले जाईल. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. सध्या अनेक संस्थांचे क्लिन अप मार्शल मुंबईत आहेत. आता क्लिन अप मार्शलला ओळखपत्र दिले जाईल. तसेच, त्यांना नागरिकांशी कसे वागावे, कसे बोलावे याचे दोन तासांचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती महापौरांनी दिली होती.
हेही वाचा - मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी परीक्षेचा निकाल जाहीर, चार हजार 798 विद्यार्थी उत्तीर्ण