मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या अवमान करण्याची भाजपमध्ये स्पर्धा सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधान परिषदेत आज या विषयावर भाजपला चांगलेच फैलावर घेतले. आज मंगळवार (दि. 27 डिसेंबर)रोजी विधान परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांवर वादग्रस्त विधाने करणाऱ्यांसाठी कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी शिवसेनेचे सदस्य अनिल परब यांनी परिषदेत केली. ( Legislative Council ) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेला उत्तर देताना, छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचा उल्लेख टाळत विरोधकांवर आरोपांचा भडीमार करत घुमजाव करण्याचा प्रयत्न केला. सभागृहात यामुळे एकच गोंधळ झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
भाजप नेत्यांच्या विधानांचा समाचार - छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या अवमान प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचा अवमान करण्याची स्पर्धा लागली आहे. (Winter session) भाजपच्या कालिदासाने महाराजांचे जन्मस्थळ बदलले, अशी उपरोधक टीका प्रसाद लाडांवर केली. राज्यपाल यांच्यापासून भाजप नेत्यांच्या विधानांचा यावेळी खरपूस समाचार घेण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी ही भाजपच्या वायफळ बडबड करणाऱ्या नेत्यांची चांगलीच हजेरी घेतली आहे.
भारतरत्न मिळाला नाही तरी चालेल पण किमान त्यांचा अपमान तरी थांबवा - विधान परिषदेत केलेल्या भाषणात फडणवीस म्हणाले की, परबसाहेब तुमच्याकडून अपेक्षा होती. पण तुम्ही आपल्या भाषणात एकदाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरण दिले नाही. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात आणि स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. त्याबाबत कुणी बोलत नाही. माझे म्हणणे आहे की, सावरकरांना भारतरत्न मिळाला नाही तरी चालेल पण किमान त्यांचा अपमान तरी थांबवा असे फडणवीस यावेळी उत्तर देताना म्हणाले आहेत.
कायदा करण्याची मागणी - शिवसेना नेते आणि आमदार अनिल परब यांनी पंतप्रधानांवर झालेली टीका सहन होत नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचे अवमान करण्याचा प्रकार भाजपमध्ये वाढीस लागल्याचा आरोप केला. छत्रपती शिवाजी महाराजा आणि इतर युग पुरूषांपेक्षा कोणीही मोठा नाही. उत्तर प्रदेशमध्ये युगपुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कायदा आणला आहे. आपण ही असा कायदा आणायला हवा. हा कायदा आपल्याकडे आणला तर महापुरूषांबाबत बोलतना प्रत्येकजण विचार करतील. मंत्री मंडळात नंबर लावण्यासाठी काहीजण अशी वक्तव्य करत आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मान कापली तरी चालेल पण महारांचा अवमान सहन करणार नाही, असे म्हणतात. महाराष्ट्रात अवमानाची मलिकाच सुरू आहे, त्यामुळे याबाबत कायदा आणावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तरे दिली.
दिवसभराचे कामकाज आटोपले - फडणवीस म्हणाले की, अतिशय गंभीर विषयावर 289 चर्चा सुरु आहे. वेगवेगळ्या गोष्टी महापुरुषांचे विधेयक आणावे, अशी मागणी उदयनराजे यांनी मागणी केली आहे. तसे पत्र देखील त्यांनी दिले आहे. परंतु, विरोधकांकडून काही जणांनी मागणी केली की उदयनराजे खरच शिवजी महाराज यांचे वंशज आहेत का? याचे पुरावे द्या. असेच एक महिला नेत्या म्हणाल्या की संजय राऊत यांच्या मातोश्री मा जिजाऊ सारख्या आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान नाही का? असा सवाल विरोधकांना विचारला. तसेच, राहुल गांधी सावरकरांना माफीवीर म्हणतात. बाळासाहेबांच्या विचाराचे त्यांच्या गळ्यात गळे घालतात, असे सांगत विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी गृहमंत्री फडणवीस यांनी मुद्द्यावर चर्चा करण्याचे आवाहन केले. तसेच, भाजपच्या आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तर विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्यावर काय कारवाई करणार, असा सवाल उपस्थित करत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे एकच गदारोळ झाला. या गदारोळात सभापती नीलम गोऱ्हे यांनी दिवसभराचे कामकाज आटोपले.