मुंबई- महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालय आणि मंत्रालयाच्या घडामोडींवर लागले आहे. त्यातच अचानकपणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निवासस्थान असलेल्या राजभवनाला केंद्रीय सुरक्षा दलांचा वेढा देण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता नाट्यांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर राजकीय भूकंप झाला. त्यानंतर वेगाने राजकीय घडामोडी घडत महाआघाडीचे नेते सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गेले. महाआघाडीच्यावतीने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमदारांचे पत्र राजभवनामध्ये सादर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस मंत्रालयात पोहोचले आहेत. त्यापार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यात आल्या आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी संपूर्ण राजभवनाला घेरले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीवरून दुपारपर्यंत राजभवनामधे पोहोचणार असल्याची माहिती आहे. महाआघाडीचे नेत्यांनी पत्र देऊन आपला सत्ता स्थापनेचा दावा आणि समर्थक आमदारांची यादी राजभवनात सादर केली आहे. एकंदरीत या सर्व राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.