मुंबई - नवी मुंबईतील विविध विकास कामांचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. पाम बिच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, गवळी देव वन पर्यटन प्रकल्प, ऐरोलीतील धर्मवीर आनंद दिघे मैदान या सारखे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना त्याचा लाभ द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - तरुणाला लुटणारी टोळी 24 तासात गजाआड, पनवेल रेल्वे पोलिसांची कारवाई
नवी मुंबईतील घनसोली येथे राखीव भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस कॉम्प्लेक्स बांधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यासंदर्भातील तांत्रिक बाजू पूर्ण करून नवी मुंबई महापालिकेने सिडकोकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
वाहतुकीचा ताण कमी होईल -
नवी मुंबईला जोडणारा आणि ठाणे-बेलापूर रस्त्याला पर्यायी ठरणाऱ्या कोस्टल रोडला जोडणाऱ्या प्रकल्पाच्या कामाबाबत यावेळी चर्चा झाली. संपूर्ण नवी मुंबई विमानतळ आणि इतर शहरांना जोडणारा कोस्टल रोड हा प्रकल्प पूर्ण झाल्यास वाहतुकीचा ताण कमी होईल, असे नगरविकास मंत्री शिदे यांनी सांगितले.
कांदळवन सुरक्षित -
घनसोली, ऐरोली उर्वरित रस्त्यावर खाडीपूल बांधण्याबाबतच्या प्रकल्पाचा आढावा यावेळी घेण्यात आला. या संदर्भात सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन संस्थांनी समन्वयातून तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. हा महत्वाचा प्रकल्प असून प्रलंबित रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल. सीआरझेड आणि कांदळवन महत्वाचा विषय असून कांदळवन सुरक्षित ठेऊन पुढे जाता येईल अशा पद्धतीने काम करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भूमिपुत्रांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा -
तुर्भे रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या सेक्टर 20 मधील भुयारी मार्गाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात यावे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गवळी देव ते सुलाई देवी वन पर्यटनस्थळाला निधी द्यावा. रोपवेची आवश्यकता आहे का, याची तपासणी करावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कळवा ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्प, नवी मुंबईतील भूमिपुत्रांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. या संदर्भात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
सिडकोने पुढाकार घ्यावा -
नवी मुंबईतील 13 रेल्वे स्थानक सिडकोने बांधली आहेत. त्या ठिकाणी लिफ्ट आणि सरकते जिने करण्यासाठी सिडकोने पुढाकार घेण्याबाबत खासदार विचारे यांनी मागणी केली. यावेळी नवी मुंबई महापालिका आयुक्त बांगर यांनी नवी मुंबईच्या महत्वाच्या प्रकल्पांबाबत सादरीकरण केले.
या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. राजीव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.
हेही वाचा - कोरोना काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 74 कोटी 16 लाख रुपयांचे बनावट मद्य आणि मुद्देमाल जप्त