मुंबई - काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या डोंगरी, नवी मुंबई परिसरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपासणी झाली होती. या कारवाईत दाऊद इब्राहिम याचा हस्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंकू पठाणला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर चिंकू पठाणचा ताबा आता राज्याच्या एटीएसने घेतल्याचे समोर येत आहे. चिंकू पठाण हा तडीपार असताना सतत मुंबईत येऊन अमली पदार्थांचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर येत आहे. याच अनुषंगाने चिंकू पठाणला मुंबई एटीएसच्या ताब्यात देण्यात आल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
5 वर्षात 1500 कोटींच्या अमली पदार्थांची विक्री
चिंकू पठाण हा दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक मानला जातो. चिंकू पठाण व आरिफ भुजवाला या दोघांनी मिळून मुंबईतील अमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी कार्यरत ठेवली होती. गेल्या पाच वर्षांमध्ये या दोघांनी मिळून तब्बल 1500 कोटी रुपयांची अमली पदार्थांची विक्री केली असून हवालामार्गे हा पैसा परदेशात पाठवून दहशतवादाला मदत केल्याचा आरोप चिंकू पठाणवर करण्यात आला आहे.
कैलास राजपूत एनसीबीच्या रडारवर
एनसीबीकडून आरिफ भुजवाला याची चौकशी केली तेव्हा त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली. दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या अनिस इब्राहिम याच्यासाठी काम करणाऱ्या कैलास राजपूत उर्फ केआर हा दाऊदचा अमली पदार्थांचा कारभार यूएईमधून चालवत आहे. एनसीबीने अटक केलेल्या आरिफच्या कबुली जबाबात त्याने कैलास राजपूत याची दुबईत जाऊन अनेकवेळा भेट घेतली आहे. त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचेही समोर आले आहे. याची पडताळणी एनसीबी पथक करत आहे. कैलास राजपूत हा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल, डीआरआय मुंबईच्या वॉन्टेड लिस्टमध्येही आहे.
हेही वाचा - बजेट हे देशासाठी हवे, निवडणुकांसाठी नको - मुख्यमंत्री ठाकरे