मुंबई - साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे. याप्रकरणी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.
प्रकरण काय?
साकीनाका येथील 32 वर्षीय महिलेवर अमानुष्य कृत्य करण्यात आले. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे २४ तासांहून अधिक काळ सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
मुंबईत साकीनाका येथील खैराणी रोडवर रात्रीच्या सुमारास एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात सळई टाकून जखमी करण्यात आले होते. या महिलेला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या महिलेचा मृत्यू झाला आहे. अतिरक्तस्त्राव झाल्याने पीडित महिला वाचू शकली नाही. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी एकाला अटकही केली आहे.