मुंबई - येत्या 28 मे पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळातील विधानसभा किंवा विधान परिषद सदस्य न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. या राजीनाम्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पदावर कायम राहू शकतात. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर ही वेळ आल्यास त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागू शकतो.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने घटनात्मक तरतुदीनुसार मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर पुढच्या 6 महिन्यात मुख्यमंत्र्यांना विधीमंडळाच्या विधानसभा अथवा विधान परिषदेत सदस्य म्हणून निवडून यावे लागते. मात्र, सदस्य होण्यासाठी 28 मे रोजी मुदत संपणार असून अद्याप विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली नाही.
येत्या 24 एप्रिलला परिषदेच्या 8 सदस्यांची मुदत संपत आहे. मात्र, सद्याच्या कोरोनाचा उद्भवलेल्या स्तिथीमुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही. साधारणपणे सदस्यांची मुदत संपल्यानंतर महिनाभराच्या अवधीत ही निवडणूक जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र, सद्याच्या कोरोना संसर्गाच्या स्तिथीत ही निवडणूक कधी जाहीर होईल हे सांगता येत नाही. येत्या 24 एप्रिलला राष्ट्रवादीचे हेमंत टकले, आनंद ठाकूर आणि किरण पावसकर यांची मुदत संपत आहे. तर भाजपच्या स्मिता वाघ, पृथ्वीराज देशमुख, अरुण अडसर काँग्रेसचे हरिभाऊ राठोड आणि शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे , चंद्रकांत रघुवंशी यांची ही मुदत संपत आहे.
यापैकी रघुवंशी यांनी मुदत संपण्याच्या आधीच आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याच बरोबर राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपचे चंद्रकांत पाटील हे विधानसभेत निवडून गेल्याने परिषदेतल्या या जागा ही रिक्त आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 6 महिन्यांच्या मुदतीत परिषद अथवा विधानसभेचे सदस्य होता आले नाही तर त्यांच्या पुढे राजीनाम्या शिवाय 2 पर्याय आहेत. विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याशी याबाबत चर्चा केल्या नंतर त्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक एप्रिल मध्यावर जाहीर झाल्यास 27 मे पूर्वी ते निवडून येऊ शकतात. तसेच अत्यंत अपवादात्मक स्तिथीत राज्यपाल नियुक्त सदस्याने राजीनामा दिल्यास त्या जागेवर राज्यपाल ठाकरे यांची नियुक्ती करू शकतात, त्यानंतर परिषदेच्या निवडणुकीत नियमित निवडून येऊ शकतात.