मुंबई - महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीसह इतर परिसरात लाखोंच्या संख्येने नागरिक येतात. मात्र, सध्या अरबी समुद्रावर चक्रीवादळाचे सावट घोंगावत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात आलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेणार आहेत.
हेही वाचा - विकास कामांना आम्ही थांबवणार नाही - मुख्यमंत्री
अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्री वादळ येणार आहेत. त्यामुळे येत्या 24 तासात मुंबईत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासून शहरात रिमझिम पाऊस सुरू आहे. 6 डिसेंबरला नागरिकांची संख्या आणखी वाढते. या कालावधीत चक्री वादळामुळे काही नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास आपत्कालीन व्यवस्थापन कसे केले जाईल, याचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. दोन ते तीन वर्षांपूर्वी वादळामुळे मंडप कोसळून दोन जण जखमी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.