मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद धुमसत असताना कर्नाटकात सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. सीमावाद सोडवण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने महाराष्ट्रातील नेत्यांची फौज महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात प्रचारासाठी कर्नाटकात उतरवली आहे. कर्नाटकातील मराठी भाषिक यामुळे संतप्त झाले आहेत. मराठी भाषिकांची नाराजी लक्षात घेत, मुख्यमंत्र्यांनी शिलेदार, मंत्री शंभूराजे देसाई यांना कर्नाटकात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कर्नाटकात का येत नाहीत, खुर्ची जाण्याची भीती वाटतेय का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
निवडणुकीची रणधुमाळी सुरू : महाराष्ट्रात बाजार समितीचे तर कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत बाजी मारण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. कर्नाटकात भाजप, काँग्रेस पक्षाकडून मराठी भाषिकांच्या विरोधात प्रचार करत आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 40 जणांची टीम मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या दिमतीला पाठवली आहे. तर काँग्रेसकडून प्रा. वसंत पुरके, डॉ. नितीन राऊत, मोहन जोशी, डॉ. वर्षा गायकवाड, सुनील केदार, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह 28 जणांना प्रचारासाठी जाणार आहेत. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी ठाम उभा आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.
मुख्यमंत्र्यांना भाजपची भिती वाटते का : यंदा शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला कोण पाठिंबा देईल, अशी चर्चा रंगली होती. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मागितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस सुट्टीवर असल्याचे सांगत वेळकाढूपणा करण्यात आला. अखेर, मंत्री शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्र्यांची, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाची भेट घडवून दिली. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रचारासाठी मंत्री शंभूराज देसाई यांना पाठवले जाईल असे सांगण्यात आले. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांनी प्रचारासाठी यावे, अशी विनंती केली. परंतु, मुख्यमंत्र्यांनी वेळ नसल्याचे कारण पुढे केले आहे. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पद मिळालेल्या एकनाथ शिंदे यांना भाजपची भीती वाटते का? असा प्रश्न आता कर्नाटकात मराठी भाषिक उपस्थित करत आहेत.
मराठी भाषिकांचा विश्वासघात : कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने यंदा पाच उमेदवार रिंगणात उतरले आहेत. आतापर्यंत तीन जागा निवडून आणण्यात महाराष्ट्र एकीकरण समितीला यश मिळाले होते. 2018 मध्ये मराठी एकीकरण समितीत पडलेल्या फुटीचा मोठा फटका बसला होता. मात्र, मराठी भाषिकांच्या जमिनीपासून विविध प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या कामाने प्रेरित होऊन, भाजपकडे गेलेला तरुणवर्ग आता महाराष्ट्र एकीकरण समितीकडे वळला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती यामुळे मजबूत झाली आहे. परंतु, महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर एकमताने ठराव मंजूर करणाऱ्या भाजप काँग्रेसकडून दुट्टपी भूमिका घेतली जात असल्याने मराठी भाषिकांचा मोठा विश्वासघात होतो आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकारांवर घाला घालण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका केली जात आहे.
भाजप, कॉंग्रेसची दुटप्पी भूमिका उघड : महाराष्ट्र एकीकरण समिती पूर्ण ताकतीने पाच विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहे या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील, शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत, शिंदे गटाकडून शंभूराज देसाई हे प्रचाराला उपस्थित राहणार आहेत. पाच मतदारसंघात प्रचार झाल्यानंतर सभा होणार आहेत. पाच ही जागांवर आम्ही बाजी मारू असा विश्वास, कर्नाटक राज्यातील माजी आमदार मनोहर किनेकर यांनी व्यक्त केला. तसेच, सीमा वादाचा प्रश्न सोडवू, असा दावा करणाऱ्या भाजप आणि काँग्रेसने मराठी भाषिकांची अवेहलना केल्याचे सांगत त्यांच्या भूमिकेवर किनेकर यांनी जोरदार टीका केली.
मिंधे असल्याचे सिध्द केले : महाराष्ट्र एकीकरण समितीला कायम पाठिंबा देत आलो आहोत. मराठी माणसांची ही संघटना कर्नाटक सरकारच्या मुजोरगिरी विरोधात लढा देत आहे. त्यांचे मनोबळ आणि पाठबळ वाढण्यासाठी खासदार संजय राऊत येत्या 3 मे रोजी कर्नाटकात जाणार आहेत. येथे त्यांची जाहीर सभा होईल, अशी प्रतिक्रिया खासदार, शिवसेना नेते अरविंद सांवत यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्नाटकातील प्रचारातून माघार घेतल्याने ते मिंधे असल्याचे सिध्द केले. भाजपच्या तालावर नाचणाऱ्या मिंधेंना निवडणूक काय कळणार, असा खोचक टोलाही सावंत यांनी लगावला. मंत्री देसाईंकडे जबाबदारी शिवसेना शिंदे गटाकडून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा मंत्री शंभूराज देसाई हाताळत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी देसाईंकडे जबाबदारी सोपवली आहे, असे स्पष्टीकरण वैजनाथ वाघमारे यांनी दिले.