मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स' या वेबसाईटवर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले. राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
कारवाईचे निर्देश : 'इंडिक टेल्स' ने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयीच्या लेखात अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. अतिशय अपमानजनक भाषेचा वापर यात करण्यात आला आहे. अत्यंत वेदनादायी, संतापजनक आणि घाणेरडा प्रकार असल्याचे सांगत राजकीय संघटना, सामाजिक संस्थांकडून निषेध व्यक्त केला. अनेक भागात आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. राज्य शासनाकडे याबाबत आक्षेप देखील नोंदवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करावी, असे आदेश दिले.
विरोधी पक्ष आक्रमक : इंडिक टेल्स' आणि 'द हिंदू पोस्ट' : बुधवारी (31 मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. यानंतर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
"महापुरुषांबद्दल सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या निंदकांच्या संख्येत वाढ झाली आहे. 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करत आहेत,"- अजित पवार विरोधी पक्षनेते
कडक कारवाई करणार : महापुरुषांच्या बाबत अत्यंत अभ्यासपूर्ण लिखाण करायला हवे. त्यातून त्यांचा अवमान होणार नाही, याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणे गरजेचे आहे. यापुढेमहापुरुषांबद्दल अशा प्रकारचे आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची राज्य शासन गय करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. तसेच 'इंडिक टेल्स' वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असेही स्पष्ट केले.
तातडीने कारवाई करावी : माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले, 'इंडिक टेल्स वेबसाइटवर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने लिहिली गेली आहेत. या दोन्ही व्यक्ती आपल्यासाठी देव आहेत. हे आपण अजिबात सहन करू शकत नाही. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि घाणेरड्या गोष्टी लिहिल्या जात आहेत. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. लेखन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.