मुंबई: मुंबई ही स्वप्ननगरी आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर असली पाहिजे. मुंबई शहर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प शासनाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे केले आहे. शहाजीराजे क्रीडा संकूल अंधेरी येथे मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गंत पूर्व व पश्चिम उपनगरातील प्रकल्पांचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
विविध १२०० प्रकल्प हाती घेणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई येथील सुशोभीकरणाची कामे झाल्यानंतर मुंबई सुंदर ठेवण्याची जबाबदारी मुंबईकरांची आहे. मुंबईचा विकासात्मक बदल करण्यासाठी मुंबईतील पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेणार आहोत. मुंबईतील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाने १५ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्य केला आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे फायदे सर्वसामान्य नागरिकांना होणार आहेत.
जी 20 परिषदेच्या आयोजनचा मान: मुंबईत चांगल्या दर्जाचे रस्ते निर्माण करणे, स्थानिक तरुणांना रोजगार निर्माण करण्याचा शासनाचा संकल्प आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे. यावर्षी जी 20 परिषदेच्या आयोजनचा मान आपल्या देशाला मिळाला आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. यानिमित्ताने मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्ये विविध बैठका होणार आहेत. या बैठकांसाठी जगभरातून येणाऱ्या मान्यवर प्रतिनिधींसमोर राज्याची ब्रॅडींग करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
सामाजिक परिवर्तनाची सुरवात: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचा कायापालट करण्याची संकल्पना मांडली आहे. मुंबई महानगरपालिका सक्षम आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर, सुसज्ज दिसण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. यांतर्गत भिंती सुशोभित करणे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, 20 हजार शौचालये निर्माण करणे आणि ते 24 तास स्वच्छ ठेवणे आदी प्रकल्प हाती घेतले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
प्रकाश व्यवस्था निर्माण केली जाणार: तसेच आंकाक्षित शौचालये तयार करण्यासाठी दुप्पट निधी देण्यात येणार आहे. झोपडपट्ट्यांमध्येही या कार्यक्रमांतर्गत आंकाक्षित शौचालये, कम्युनिटी वॉशिंग मशिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासोबतच हँगिंग लाईटच्या माध्यमातून प्रकाश व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. सामाजिक परिवर्तनाची सुरूवात मुंबईचा कायापालट या माध्यमातून करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.