मुंबई : या प्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणले की, अमित शहा जेव्हा कोणाच्या पाठीमागे उभे राहतात, तेव्हा ते पूर्ण ताकतीने त्याच्यासोबत असतात, याचा अनुभव मी, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
राजकीय शक्तीपेक्षा अध्यात्मिक शक्ती मोठी : याप्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, असा एवढ्या मोठ्या महासागरासमोर काय बोलावे हे सुचत नाही. मी मुख्यमंत्री म्हणून नाही तरी परिवारातील सदस्य म्हणून येथे उभा आहे. समोर बसलेल्या जनतेमध्ये माझी पत्नी, माझा मुलगा श्रीकांत शिंदे हे सुद्धा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी नमूद केलं. तसेच राज्यातील साडेबारा कोटी जनतेकडून आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राजकीय शक्तीपेक्षा अध्यात्मिक शक्ती मोठी असते त्याचे स्वरूप आपण आज इथे पाहत आहोत. राजकीय अधिष्ठानाला आध्यात्मिक अधिष्ठानाची जोड, प्रेरणा लागते. इथे आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही गर्दी झाली असून या गर्दीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
अमित भाईंकडून संघर्ष करण्याचे बळ : याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, मी जेव्हा जेव्हा अमित भाईंना भेटतो तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून काम करण्याची प्रेरणा, संघर्ष करण्याचे बळ भेटतं. अनेक वर्षापासून देशातील ३७० कलम हटले पाहिजे. राम मंदिर बनले पाहिजे. ही करोडो भाविकांची इच्छा होती. ती इच्छा अमित शहा यांनी पूर्ण केली आहे. राष्ट्रभक्तीचा दांडगा अनुभव अभ्यास अमित शहा यांना असल्याचे सांगत त्यांच्या हस्ते आज आप्पासाहेबांचा सत्कार होत आहे. हा एक दुग्ध शर्करा योग असल्याचही एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने या कार्यक्रमाला चार चांद लागल्याचे सांगत त्यासाठी त्यांनी अमित भाईंना धन्यवाद दिले आहेत. अमित भाई यांचा हात ज्या कोणाच्या मागे असतो, तेव्हा तो पूर्ण ताकतीनिशी असतो, असा माझा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगून एका प्रकारे महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.