मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती होणारच आहे. तसेच यापूर्वी मी पुन्हा येणार, म्हणून सांगितले आहेच. मी एकटा भाजपाचा मुख्यमंत्री नाही, शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे. त्यामुळे काही काळजी करू नका सगळे नीट होईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच फटकारले.
राज्यात युती होताना ज्याच्या जागा अधिक असतील त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे विधान सेनेच्या नेत्यांकडून केले जात असल्याने त्याचा समाचार घेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला फटकारले.
गोरेगाव येथील नेस्को ग्राउंड येथे आज भाजपाच्या पदाधिकारी, बूथ कार्यकर्ता आदींची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने झाला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ज्या विचाराने प्रेरित होऊन आजपर्यंत आपण काम केले, तेच विचार पुढे न्यायचे आहेत. आता लोकसभा निवडणुका झाल्या असल्याने त्यासाठी रणनीती बदलावी लागेल. युद्ध बदलले की शस्त्र बदलावे लागतात, रणांगण बदलले आहे, रणनीती बदलावी लागेल. त्यामुळे कुठल्या जागा आपल्या याचा निर्णय लवकर होणार आहे. कोणत्याही जागा आपल्याकडे येऊ शकतात. त्याबोरबरच आपल्याला युतीमध्येच लढायचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आपल्याकडे येणाऱ्या लोकांचे स्वागत केले पाहिजे. आपली पार्टी ही अनलिमिटेड पार्टी आहे. आपल्या पक्षात ज्यांना उमेदवारी दिली त्यात केवळ १५ टक्के बाहेरचे लोक असतात. त्यामुळे येणाऱ्यांना नाराज होण्याचे कारण नाही. जे इकडे आलेले आहेत, ते आपले झालेत. आता ते दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत. त्यामुळे आपण २२० जागा पार केल्या पाहिजे, हा नारा आपण दिलाय. त्यामुळे आपल्याला प्रत्येक जागा निवडून येण्यासाठी लढायचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उमेदवारी देताना त्याचा निकष ठरलेला आहे. सगळ्यांचा फोकस हा मुंबईला असतो, त्यामुळे कोणी मुंबईला आल्यास मी त्यांचा 1 मार्क तिथेच कमी करणार आहे. कोणाच्याही जवळचा आहे, म्हणून मी तिकीट देणार नाही. जवळचा आहे म्हणून कोणी धंदे करू नका, असेही सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सज्जड इशारा दिला.
आपल्यासमोर आधीच पराभूत झालेले लोक आहेत. आपण पराभूत लोकांच्या समोर उभे आहोत, परंतु आपण कोणत्याही विरोधकांना कमजोर समजू नका. त्यांना १५ वर्षे विरोधक म्हणून काम करण्याची संधी मिळेल, यासाठी आपण मेहनत करायची आहे. त्यामुळे राज्यात लोककल्याणासाठी आपले सरकार पुन्हा येईल यासाठी शपथ घेऊ या, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
होय माझ्यात दैवी शक्ती आहे -
होय माझ्याकडे दैवी शक्ती असून ती शक्ती ही महाराष्ट्राचे नागरिक आहेत. तीच माझी शक्ती आहे, मला गमावण्या सारखे काही नाही. त्यामुळे मला चिंता नाही. मला समाजासाठी काम करायचे आहे. मागच्या सरकारमधील मंत्र्यांचा वेळ संस्था, कारखाने वाचविण्यासाठी जायचा. मात्र एकेक क्षण आम्ही जनतेसाठी देऊ शकलो, संविधानात आणि लोकशाहीत प्रचंड मोठी शक्ती आहे, सामन्याचे प्रश्न आपण सोडवू शकतो. मोदी है ती मुमकिन है, त्यामुळेच आपण सर्व प्रश्न सोडवू शकलो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.