छत्रपती संभाजीनगर : शहरातील व्यावसायिकाच्या पत्नीनं कथित पाकिस्तानच्या बॉयफ्रेन्डला भेटण्यासाठी पतीला सोडून दुबई गाठल्याची माहिती समोर आल्यानं छत्रपती संभाजीनगरात मोठी खळबळ उडाली आहे. ही महिला उमराहला जाण्यासाठी संभाजीनगरातून निघाली होती. मात्र त्यानंतर ही महिला न परतल्यानं तिच्या पतीनं 23 डिसेंबर 2022 ला पत्नी हरवल्याची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान ही महिला 4 ऑगस्टला परत आली असून त्यानंतर तिच्या पाकिस्तानच्या कथित पतीनं तिच्या छत्रपती संभाजीनगरमधील पहिल्या पतीला कॉल करुन महिलेसोबत लग्न केल्याची कागदपत्रं आणि फोटो पाठवले. त्यामुळे या महिलेच्या पतीनं महिलेबाबतची माहिती सिडको पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता मात्र एटीएस या महिलेची 'ट्रॅव्हल हिस्ट्री' शोधत आहे.
हा ईमेल आला आहे तो कदाचित खोडसाळपणानं केला असू शकतो, अशीही शक्यता नाकारता येत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याबाबत आम्ही आणि एटीएस तपास करत आहोत. त्याबद्दल आम्ही आता काही सांगू शकत नाही. गोपनीयता राखण्यासाठी आम्ही फक्त तपास करतोय, लवकरच या सर्व घटनेचा संपूर्ण पर्दाफाश होईल - स्थानिक पोलीस
महिलेच्या पतीला आला ईमेल : या महिलेच्या कथित पतीनं हा ईमेल स्थानिक पोलीस, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, सीआयएसएफ आणि नागरी विमान वाहतूक महासंचालकांनाही पाठवला होता. सध्या ही महिला मालेगाव इथं आई-वडिलांसोबत राहात आहे. स्थानिक पोलिसांनी तसंच एटीएस आणि आयबी अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.
डिसेंबरमध्ये सोडलं पतीचं घर : ही महिला दोन वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कथित पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात असल्याचं तपासात समोर आलं आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये तिनं पतीचं घर सोडलं. तिच्या पतीनं 23 डिसेंबर 2022 ला पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. संबंधित महिलेचे आईवडील मालेगावमध्ये राहत असून तिचं लग्न संभाजीनगरमधील एका व्यावसायिकासोबत झालं होतं. त्यानंतर ती संभाजीनगरमध्ये राहात होती.
पाकिस्तानी बॉयफ्रेंडसोबत केला निकाह : ही महिला कथित पाकिस्तानी बॉयफ्रेंडला सौदी अरेबियात असलेल्या मक्का मदिनात उमराह यात्रेदरम्यान पहिल्यांदा भेटली. त्यानंतर दोघांनी निकाह केल्याची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली. या सर्व बाबींची शहानिशा करण्यासाठी आम्ही महिलेची 'ट्रॅव्हल हिस्ट्री' आणि 'मोबाईल रेकॉर्ड' तपासात असल्याचं एटीएसच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
असं फुटलं महिलेचं बिंग : जानेवारीमध्ये एका आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअॅप नंबरवरुन या महिलेच्या पतीला त्याच्या पत्नीचं छायाचित्र आणि विवाह प्रमाणपत्र मिळालं होतं. तिनं कथित पाकिस्तानी बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याचा दावा महिलेच्या पतीनं तपास यंत्रणांना माहिती देत केला आहे. महिलेच्या पतीस अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला होता. तेव्हा त्या व्यक्तीनं स्वत:ला त्याच्या पत्नीचा कथित पाकिस्तानी प्रियकर असल्याचं सांगितलं होतं, असा दावाही त्या महिलेच्या पतीनं केला आहे.
तपास यंत्रणाकडून प्रचंड गोपनीयता, लवकरच होईल पर्दाफाश : हा ईमेल आला आहे तो कदाचित खोडसाळपणानं केला असू शकतो, अशीही शक्यता नाकारता येत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याबाबत आम्ही आणि एटीएस तपास करत आहोत. त्याबद्दल आम्ही आता काही सांगू शकत नाही. गोपनीयता राखण्यासाठी आम्ही फक्त तपास करतोय, लवकरच या सर्व घटनेचा संपूर्ण पर्दाफाश होईल, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -