मुंबई Chhagan Bhujbal : यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, आम्ही भाजपासोबत गेलो म्हणून आमच्यावर टीका केली जातीय. परंतु, त्यांनी याचसाठी सहा ते सात वेळा चर्चा केली होती. आपण विचार सोडलेला नाही उलट विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय. केवळ भावनेच्या आधारावर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही, असं म्हणत भूजबळ यांनी आव्हाडांवर जोरदार टीका केलीय.
सगळ्या आघाड्यांनी एकजुटीने काम केलं पाहिजे : राम मांसाहारी होता या जितेंद्र आव्हाडांच्या विधानामुळे बराच गदारोळ झाला. त्यावर भुजबळांनी खरमरीत टीका केलीय. ते म्हणाले, रामाबद्दल विधान करुन काही लोक त्यांचाच पक्ष संपवायला निघालेत. पक्ष संपवायला त्यांना बाहेरच्या लोकांची गरज नाही, हीच मंडळी पक्ष संपवतील. काय बोलता, काय करता. असेल तुमचा अभ्यास. मात्र, सध्याची परिस्थिती काय, वेळ काय आणि तुम्ही बोलताय काय अस म्हणत भुजबळांनी आव्हाडांचा समाचार घेतलाय. खेकड्यासारखं वागू नका, एकमेकांना साथ देण्याचा प्रयत्न करा. महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी इतर सगळ्या आघाड्यांनी एकजुटीने काम केलं पाहिजे असही भुजबळ यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना म्हणालेत.
ग्राऊंडवर उतरून काम करा : आम्ही सरकारमध्ये येण्याचा निर्णय घेतला म्हणजे विचारधारा बदलली नाही. नितीश कुमारसुद्धा भाजपसोबत गेले होते, पण त्यांनी विचारधारा बदलली नाही. आमचीही तीच फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा आहे. सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचंय. त्यामुळे तुम्हीही ग्राऊंडवर उतरून काम करा, असं आवाहन छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केलय.
कामाला लागण्याचं आवाहन : यावेळी भुजबळांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. मराठा आरक्षणाला कुणाचाच विरोध नाही. परंतु, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, ही माझी भूमिका आहे. मुळात हीच भूमिका सगळ्यांची आहे. परंतु, मी फक्त अभ्यासपूर्ण मांडणी करतो आहे, एवढंच. येत्या काळामध्ये आपल्याला सर्व समाजाला हे मुद्दे पटवून द्यायचे आहेत, असं म्हणत त्यांनी कामाला लागण्याचं आवाहनही यावेळी केलय.
हेही वाचा :
1 बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबड अन् शुद्ध आल्यावर वेगळीच बडबड; धनंजय मुंडेंची आव्हाडांवर टीका
2 वाहनांची रांग पाहून राज ठाकरे उतरले टोल नाक्यावर; मग काय झालं? पाहा व्हिडिओ
3 जितेंद्र आव्हाड वादग्रस्त वक्तव्यामुळं सतत वादाच्या भोवऱ्यात, आव्हाड आणि वाद काय आहे समीकरण?