मुंबई - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाजपच्या निशाण्यावर होते. निवडणुकीदरम्यान शरद पवारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीव्र टीका केली होती. याला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीवेळी शोलेचा किस्सा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांची अवस्था 'शोले'तल्या 'सांभा'सारखी झाली आहे. अरे ओ सांभा कितने आदमी थे...सरदार एकही आदमी था...शरद पवार, असा टोला भुजबळांनी लगावला. पराभूत झालेल्या उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
राष्ट्रवादी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आज मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छगन भुजबळांनी पराभूत उमेदवारांना मार्गदर्शन केले.