मुंबई - इतर कोणत्याही वस्तूचे भाव वाढले तर निर्यातबंदी केली जात नाही, मग कांद्याच्याबाबतीत असे का? कांद्याला भाव मिळत असताना निर्यात बंदीकरून केंद्र सरकार शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
ज्यावेळी कांद्याचे भाव गडगडतात आणि शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून तो रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. अनेकदा कांद्याची नासाडी होते, त्यावेळी मात्र शेतकऱ्यांकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे कांद्याला भाव मिळत असताना निर्यातबंदी करणे, ही शेतकऱ्यांची अडवणूकच आहे. केंद्राच्या या भूमिकेमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. राज्यातील सर्व खासदारांनी एकत्र येऊन यासंदर्भात आवाज उठवावा, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.
कांद्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान होत असते. पावसाच्या काळात कांदा विकला गेला नाही, तर त्याला खूप मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागते. पावसाळ्यातच केंद्र सरकारने कांद्याची निर्यात थांबवली. त्यामुळे हजारो टन कांदा पडून आहे. विकला गेला नाही तर हा कांदा सडून जाणार. निर्यातबंदी मुळे कांद्याचे भाव गडगडणार आणि शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर येणार असल्याचे भुजबळ म्हणाले.