मुंबई - साकीनाका खैराणी रोड येथे आशापुरा कंपाऊंडला लागलेल्या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पुन्हा एकदा अग्निसुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे रहिवासी वस्तीतून केमिकल कारखाने हद्दपार केले पाहिजेत, असे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले.
खैराणी रोडवरील आशापुरा कंपाऊंडला शुक्रवारी सायंकाळी आग लागली होती. आग लागलेल्या ठिकाणी केमिकल असल्याने आगीने भीषण रूप धारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत आरती लालजी जैसवाल (वय-२५) आणि पियूष धीरज काकडीया (वय-४२) या दोघांचा मृत्यू झाला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. शहरातील आगीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे पेडणेकर म्हणाल्या.
हेही वाचा - आयआयटी टेक-फेस्ट'मध्ये येणार 'अल्बर्ट आईनस्टाईन'..
सोमवारी बैठक -
मुंबईत कमला मिल, भानू फरसाण आगीत मोठ्या प्रमाणात झाल्याने अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नसलेले अनेक कारखाने बंद केले होते. मात्र, काही दिवसात हे कारखाने पुन्हा सुरू होतात. लोकचं लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. ज्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थांचा वापर होतो त्या ठिकाणी स्वतःची अग्निशमन यंत्रणा गरजेची आहे. हे कारखाने रहिवासी वस्तीमध्ये असल्याने दुर्घटनांमध्ये नागरिकांचे जीव जात आहेत. त्यामुळे धोकादायक कारखाने रहिवासी वस्तीमधून बाहेर गेले पाहिजेत. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची बैठक आयोजित केल्याचे महापौरांनी सांगितले.
तर संपूर्ण वस्ती आगीचे भक्ष्य झाली असती -
सोसायट्या आणि हॉटेलमध्ये अग्निशमन यंत्रणा असली पाहिजे. यासाठी अग्निशामक दल आणि महानगरपालिकेने तपासणी मोहिम हाती घेतली आहे. अग्निशामक दल आणि पालिका नागरिकांच्या हिताचे काम करत आहे. खैराणी रोड येथील आशापुरा कंपाऊंडला लागलेल्या आगीत अग्निशामक दलाने बांधकामे तोडून आग आटोक्यात आणली. या ठिकाणी असलेले केमिकल पाण्यात मिसळून नाल्यात गेले असते तर संपूर्ण वस्ती आगीचे भक्ष्य झाली असती, अशी माहिती महापौरांनी दिली.