मुंबई - येथील चेंबूरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर उपचार घेत असताना १९ वर्षांच्या मुलीचा बुधवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. तर बलात्काराचा गुन्हा महिनाभरापूर्वी दाखल होऊनही आरोपीला अटक करण्यात आली नाही. हा सर्व प्रकार संताप आणणारा आहे. म्हणून स्थानिक पोलिसांची भूमिका पाहता या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, जालना जिल्ह्य़ातील मुलगी काही महिन्यांपूर्वी चेंबूरमध्ये राहणाऱ्या भावाकडे आली होती. ७ जुलैला ती मैत्रिणीसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली असता तिच्यावर चौघांनी बलात्कार केला. त्यानंतर या मुलीची प्रकृती बिघडल्याने पालकांनी आधी गावी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती सुधारत नसल्याने तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यावेळी या मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. पीडित मुलीला मोठा धक्का बसल्याने ती जास्त काही सांगू शकली नाही.
त्यानंतर औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर २ ऑगस्टला चुनाभट्टी पोलीस ठाण्यात हा वर्गही करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल होऊन महिना उलटला तरीही चुना भट्टी पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नाही. हा प्रकार चीड आणणारा तसेच पोलिसांची निष्क्रियता व असंवेदनशीलता दाखवणारा आहे. तसेच सामूहिक बलात्काराची ही घटना अत्यंत दुर्दैवी तसेच संताप आणणारी आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी या घटनेचा निषेध केला.
तर चुनाभट्टी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पोलीस कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय येत आहे, असे ते म्हणाले. एवढा गंभीर गुन्हा दाखल होऊनही पोलीस महिनाभर कशाची वाट पाहत होते ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
भाजप-शिवसेना सरकार गुन्हेगारी रोखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. राज्यात मुली व महिला सुरक्षित नाहीत. त्यांच्यावरील अत्याचारांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. पुण्यात एका मुलीवर झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झाली. मात्र, त्याची अंमलबजावणीही करता आली नसल्याचा प्रकारही नुकताच उघड झाला आहे. नागपूरमध्ये दिवसाढवळ्या मुडदे पडत आहेत, पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांनी हैदौस घातला आहे. खून, बलात्कार, दरोडे यांच्यात वाढ झालेली असताना गृहविभाग मात्र अजगरासारखा सुस्त पडलेले आहे.
तर मोठ्या अट्टाहासाने गृह मंत्रालय आपल्याकडे ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांचा विभागावर वचक नाही. हे पाच वर्षात घडलेल्या घटनांवरून दिसते आहे. चेंबूरमध्ये एवढा गंभीर गुन्हा घडला असताना मुख्यमंत्री मात्र प्रचार यात्रेत मग्न आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.