मुंबई Chembur Accident News : शनिवारी (28 ऑक्टोबर) रात्री 11.15 वाजेच्या सुमारास मुंबईतील चेंबूर येथील डायमंड गार्डनजवळ एका भरधाव कारने सिग्नलवर उभ्या असलेल्या स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघातात स्कूटरवर बसलेले पिता-पुत्र आणि मुलगी गंभीर जखमी झाले. याप्रकरणी नशेत असलेल्या महिला वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला अटक करण्यात आली आहे. तसंच आरोपी महिला ही कुर्ला येथील रहिवासी आहे. तसेच ती आर्किटेक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गाडीवरचा ताबा सुटल्यानं घडली घटना : मिळालेल्या माहितीनुसार, कार चालवणारी महिला मद्यधुंद अवस्थेत चेंबूरच्या दिशेने भरधाव वेगात निघाली होती. महिलेची कार ही डायमंड गार्डनजवळ आली असता तिचा गाडीवरचा ताबा सुटला. समोर उभ्या असलेल्या स्कूटीला जाऊन तिची कार धडकली. या अपघातात हर्ष जयस्वाल, समृद्धी जयस्वाल, दीपू जयस्वाल हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या झेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
अपघातग्रस्त कुटुंबीयांचा राग अनावर : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेला मेडिकलसाठी नेत असताना प्रकरण अधिकच तापले. यावेळी अपघातग्रस्त कुटुंबीयांचा राग अनावर झाला. त्यांनी आरोपी महिलेला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना वेळीच थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
...ड्रंक अँड ड्राईव्हचे कलम लावण्यात येणार : दरम्यान, याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधानाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालक महिला आरोपी जर मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले तर तिच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हच देखील कलम लावण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -