मुंबई - कोरोनाचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. राज्यात लॉकडाऊनचा काळ 31 मे पर्यंत वाढवला गेला असून पोलिसांकडून कलम 144 शहरात लागू करण्यात आलेला आहे.
20 मार्च ते 25 मे या दरम्यान मुंबई शहरातील विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 7 हजार 34 प्रकरणात तब्बल 14 हजार 323 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या 1 हजार 888 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 3 हजार 758 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तर, 8 हजार 677 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.
गेल्या 24 तासात मुंबई शहरात कलम 144 नुसार पोलिसांनी तब्बल 29 जणांवर कारवाई केलेली आहे. यामध्ये विनापरवाना हॉटेल, आस्थापन सुरू ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दक्षिण मुंबईत एकूण 4 जणांवर कारवाई करण्यात आलेली असून, मध्य मुंबईत 12, पूर्व मुंबईत 5 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर, पश्चिम मुंबई 7 व उत्तर मुंबई 1 अशी कारवाई मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.