मुंबई : नोव्हेंबर 2021 मध्ये सदिच्छा साने ही बेपत्ता झाल्याचे समजले. बेपत्ता होण्याआधी आरोपीसोबत सदिच्छा साने होती. हे मोबाईल लोकेशनवरून पोलिसांना समजले. सदिच्छा सानेचा खून आरोपी मिथू सिंह आणि जब्बार अन्सारी यांनी केल्याबाबतचे आरोप पत्र मंगळवारी महानगर न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केले. या आरोप पत्रामध्ये विविध सव्वाशे व्यक्तींची साक्ष नमूद करण्यात आलेली आहे. न्यायालयात चार महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आलेली आहे. सध्या सदिच्छा साने खून प्रकरणी आरोपी जब्बार अन्सारी आणि मिथू सिंह हे तुरुंगात आहेत.
काही व्यक्तींचे जबाब : 29 नोव्हेंबर 2021 च्या रात्री वांद्रे येथील बँड स्टँड या ठिकाणी आरोपी मिथू सिंह आणि सदिच्छा साने हे काही काळ एकत्र दिसले असल्याची बाब पोलिसांच्या चौकशीतून समोर आली. त्या दोन्ही व्यक्तींना शेवटच्या वेळी पाहणाऱ्या काही व्यक्तींचे जबाब पोलिसांनी महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर नोंदवलेले आहेत. त्याशिवाय इतर दोन आरोपीचे जे बोलणे होते, ते बोलणे देखील साक्षीदाराने ऐकले असल्याचे आपल्या साक्ष जबानीत नमूद केलेले आहे.
सर्व कृत्यांचे स्क्रीन शॉट : आरोपीने स्वतःला वाचवण्यासाठी अनेक बाबी केल्या असल्याचे देखील या चौकशी मधून समोर आलेले आहे. आरोपी मिथू सिंह याने सदिच्छा हिचा मोबाईल फोन एरोप्लेन मोडवर ठेवला होता. म्हणजे जाणून-बुजून तपास होताना त्याच्याकडे दुर्लक्ष होईल. तरीही सदिच्छा साने हिला त्याने खूप मिस कॉल केले होते. त्याबरोबरच तिला सोशल मीडियावर मैत्री करण्यासाठी विनंतीचा मेसेज देखील टाकला होता. आरोपी मिथु सिंहने ह्या प्रकरणातून सही सलामत सुटण्यासाठी या सर्व कृत्यांचे स्क्रीन शॉट काढले होते. अशा अनेक बाबी चौकशीतून समोर आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मृतदेह मिळालेला नाही : आरोपींच्या चौकशीतून हे देखील बाब समोर आलेली आहे की, जेव्हा सदिच्छा बेपत्ता झाली, त्या दिवशी ती रात्री वांद्रे शहरातील बॅन स्टँड येथे होती. मिथू देखील तिच्यासोबत होता. त्यांनी एकत्र छायाचित्र देखील घेतले. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील मिथू सिंहसारखी एक व्यक्ती घाईघाईने त्या स्थळी गेल्याचे देखील दिसलेले आहे. मुंबई पोलिसांना आतापर्यंत सदिच्छा साने हिचा मृतदेह मिळालेला नाही.