मुंबई - गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा वाद सुरू आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पहायला मिळत आहे. 1995 साली महापालिकेने भाजप-सेनेने औरंगाबाद नामांतराचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळच्या युती सरकारने नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेस–राष्ट्रवादीच्या सरकारने दोनदा न्यायालयात नामांतर प्रस्ताव रद्द करत असल्याचे स्पष्ट केले होते. आज त्याच दोन पक्षांसोबत शिवसेना सत्ता चालवत आहे. त्यामुळे शिवसेना याविषयी बोलायला तयार नाही. नेमक्या याचाच फायदा घेत विरोधक शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.
नामांतरवर शिवसेना आग्रही नाही -
भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील आता नामांतरवरून शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेच्या भूमिकेत बदल हा संगतीचा परिणाम आहे. तसेच यापुढे शिवसेना मुस्लीम मेळावा पण भरवेल. यावरून नामांतरवर शिवसेना आग्रही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.