पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे ईव्हीएम विरोधात आत्मक्लेष आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी उपोषणस्थळी जात आढाव यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ईव्हीएमवरुन टीका केली.
नेमकं काय म्हणाले शरद पवार? : यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, "सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर यापूर्वीच्या निवडणुकींमध्ये कधीही बघितला नव्हता. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे चित्र पाहायला मिळालं. त्यामुळं लोकांच्या मनातील अस्वस्थता वाढली आहे. विरोधी पक्षानं हे प्रश्न संसदेत उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही सभागृहात त्यांना बोलू दिलं जात नाही. राज्यकर्त्यांकडून सबंध लोकशाहीवर आघात केला जातोय. त्यामुळं आता लोकांमध्ये जाऊन त्यांना जागृत करणं गरजेचं आहे."
ईव्हीएम विषयी काय म्हणाले? : विधानसभा निवडणुकीत 15 टक्के मतं ही ईव्हीएममध्ये सेट करण्यात आल्याचा आरोप विरोधक करताय. यावर पवार म्हणाले, "काहीजणांनी आमच्या समोर ईव्हीएम मशीनमध्ये घोळ कसा केला जाऊ शकतो, याचं प्रेझेंटेशन दिलं. मात्र, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. तसंच निवडणूक आयोग इतक्या टोकाची भूमिका अशा चुकीच्या पद्धतीनं घेईल, असं वाटलं नव्हतं. परंतु, यामध्ये आता तथ्य आहे असं वाटतंय." तर दुसरीकडं काही उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. याबाबत विचारण्यात आलं असता पवार म्हणाले, "फेर मतमोजणी केल्यावर काय निकाल येतील हे आपण पाहूया. पण मला चिंता वाटत आहे की यातून काही पुढं येईल असं दिसत नाही. तसंच शेवटच्या दोन तासांची जी आकडेवारी आलीय. ती अतिशय धक्कादायक असून फक्त बाळासाहेब थोरातच नव्हे तर अनेकांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी इंडिया आघाडीच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल", असंही यावेळी पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा -