मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचा उद्या 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. इर्शाळवाडीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फडणवीसांचा वाढदिवस साजरा केला जाणार नाही. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस हा राज्यभर "सेवा दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 22 जुलै 2023 ते 22 जुलै 2024 या एका वर्षात राज्यात 50 हजार रुग्ण मित्र तयार केले जाणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
कुठेही अभिनंदनाचे कार्यक्रम नाहीत : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून बचावकार्य अद्याप सुरू आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. याबाबत माहिती देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अभिनंदनाचे राज्यात कुठेही बॅनर, होर्डिंग्ज, पोस्टर लावले जाणार नाहीत. त्याच बरोबर कुठेही कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत.
एका वर्षात 50 हजार रुग्ण मित्र : देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात कुठेही रंगारंग कार्यक्रम अथवा अभिनंदनाच्या फलकांची बॅनरबाजी करू नये. याऐवजी राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, अन्नधान्य वाटप, जीवनावश्क वस्तूंचे वाटप करण्याचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. त्याचसोबत 23 जुलै 2023 ते 22 जुलै 2024 या एका वर्षात राज्यात 50 हजार रुग्ण मित्र तयार केले जाणार आहेत. विशेष करून कोकणातील डोंगर पायथ्याशी असलेल्या वस्तींच्या भागात, गडचिरोली तसेच आदिवासी दुर्गम भागात हे रुग्ण मित्र तयार केले जातील. जेणेकरून नैसर्गिक आपत्तीत प्रथमतः हेच रुग्ण मित्र कामी येणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले.
विरोधी पक्षनेत्याची सत्तेत उडी : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन 5 दिवस झाले तरी अजून विरोधकांनी विरोधी पक्षनेत्याची निवड केली नाही आहे. या प्रश्नावर बावनकुळेंनी विरोधकांना टोला मारला.
विरोधक सर्वजण संभ्रमात आहेत. त्यांच्यामध्ये संशयाचे वातावरण आहे. सभागृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर विरोधकांचा टिकाव लागणार नाही, हे त्यांनाही माहीत आहे. अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड जरी झाली तरी कालांतराने तो सत्तेमध्ये उडी मारतो. ही भीती सुद्धा त्यांना आहे. म्हणून विरोधी पक्ष नेत्याची निवड झाल्यावर त्याचा ब्लड ग्रुप तपासणे गरजेचे आहे. - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
हेही वाचा -
- Maharashtra Monsoons session 2023: मणिपूर सरकारच्या निषेधाचा करणारा ठराव करा... महिला आमदारांना बोलू न दिल्याने विरोधकांचा तीव्र संताप
- Upcoming Assembly Elections : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १५२ जागा जिंकणार - चंद्रशेखर बावनकुळे
- Chandrashekhar Bawankule :... तर जोडे खावे लागतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा