मुंबई - राज्यातील सत्तानाट्यावर सुरू असलेल्या गोंधळावर सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 30 तास उरले आहेत. याबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्या बहुमत सिद्ध करून दाखवू, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रामधील सत्तानाट्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या बुधवारी बहुमत चाचणी घेण्यास सांगितले आहे. बुधवारी ५ पर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करण्यात यावा. तसेच विश्वासदर्शक ठरावाचे लाईव्ह चित्रीकरण करण्यात यावे, असे न्यायालयाने सांगितलं आहे. यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार असून उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण आदर करत असल्याचेही यावेळी ते म्हणाले.
हेही वाचा - बहुमत चाचणी उद्याच; सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया...
“लोकशाही मूल्यांचं रक्षण होणे आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मूलभूत अधिकार आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या (२७ नोव्हेंबर) सायंकाळी ५ पर्यंत बहुमत चाचणी घेण्याचा आदेश आम्ही देत आहोत,” असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. बहुमतासाठी घेण्यात येणारे मतदान हे गुप्त पद्धतीने न घेता ते थेट घेण्यात यावे, तसेच या मतदानाचे थेट प्रेक्षपण करण्यात यावे, असेही न्यायलयाने स्पष्ट केले आहे. संबंधित निकाल देताना न्यायलयाने बहुमत चाचणीसाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून आमदारांना शपथ देण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का, उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश