मुंबई - मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले आहे, त्याला धक्का लागलेला नाही. न्यायालयात वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया कधी सुरू झाली यावर सुनावणी सुरू होती. आता नवीन प्रक्रिया राबवावी लागणार आहे. यामध्ये (आधीच्या प्रक्रियेत प्रवेश मिळालेली ) मराठा समाजाची मुले ही सामावून घेतली जातील, त्यासाठी जादा जागांची मागणी केंद्राकडे करू असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परीषदेत सांगितले.
दंतवैद्यक व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण (एसईबीसी) पूर्वलक्षीप्रभावाने लागू करण्याची मागणी होती. आता पुढील वर्षी या आरक्षणाचा फायदा मिळेल. आता नवीन प्रक्रिया राबवावी लागेल, यामध्ये (आधीच्या प्रक्रियेत प्रवेश मिळालेली ) मराठा समाजाची मुले ही सामावून घेतली जातील. बाकी जी रहातील तेवढ्या वाढीव जागांची मागणी आम्ही केंद्राकडे करू असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
नारायण राणे यांच्या विषयी बोलताना पाटील म्हणाले, राणेंनी माझ्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यांनी माझ्यावर टीका केलेली नाही आणि मी दोन नंबरचा मंत्रीपण नाही. तसेच शरद पवारांना ईव्हीएमबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत म्हणाले, निकालाची चाहूल लागल्यानेच पवार ईव्हीएमवर संशय व्यक्त करत आहेत.