मुंबई : तुमची होळीची तयारी पूर्ण झालेय का? नसेल तर थोडं थांबा कारण, होळीपूर्वी हवामानात बदल होऊ लागला आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हवामान विभागाने एक इशारा दिला आहे. त्यानुसार सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. पण हवामान विभागाच्या माहिती नुसार येत्या काही दिवसांत अनेक विभागांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सोबतच डोंगराळ भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाची अपडेट : भारतीय हवामान विभाग दररोज सकाळी हवामाना संदर्भात अपडेट माहिती जाहीर करत असते. आज विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आकाश ढगाळ असून लोकांना उष्णते सोबतच थंडी जाणवू लागली आहे, अशा परिस्थितीत होळीपूर्वी राज्यात पाऊस पडण्याची पूर्ण शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे तुम्हीही होळीच्या दिवशी कुठे जाणार असाल तर थोडे अधिक कपडे आणि रेनकोट सोबत ठेवा.
काही ठिकाणी तुरळक तर : हवामान विभागाच्या अदाजानुसार येत्या काही दिवसात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, या भागात हलक्या सरी, मेघगर्जनेसह पाऊस तर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात हलक्या सरी ठाणे जिल्ह्यात तसेच औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस तर मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर वर्धा येथे तुरळक तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ येथेही विजांसह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तर पावसाचा सामना : तुम्हाला कधीही कडाक्याचं ऊन, थंडी आणि कधीही पावसाचा सामना करावा लागू शकतो. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे आजपासून होळीपर्यंत म्हणजेच ४ ते ७ मार्चपर्यंत आकाश ढगाळ असल्याने चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. होळीनंतर पुन्हा कडाक्याचं ऊन पडेल. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान बदलाचा तब्बेतीवर परिणाम : यावर्षी सर्व ऋतू लोकांना एकत्रच अनुभवता आलेत. कधी कडकडीत ऊन तर कधी कडाडून थंडी यात मध्येच पाऊस डोकं वर काढतो. या झटक्यात बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम अनेकांच्या तब्बेतीवरही झाल्याचं निदर्शनास आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीपाठोपाठ येणार्या उष्णतेमुळे लोकांचे हाल होत आहेत. तब्येतही ढासळली आहे, लोकांना सर्दीसोबत खोकला, ताप येऊ लागला आहे. त्यामुळे दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये अनेकांनी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.