मुंबई - येथील धारावी आणि मुंबईतील काही भागात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (सीएपीएफ) जवान तैनात करण्यात आले आहेत. शहरात पोलिसांना लॉकडाऊनच्या काळात मदत आणि लॉकडाऊनचे तंतोतंत पालन होण्यासाठी केंद्रीय सुरक्षा बलास पाचारण केले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या (सीआरपीएफ) स्थानिक पोलिसांसह धारावी येथे तैनात करण्यात आल्या आहेत.
धारावी मुंबईत कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे, तेथील रुग्णांची संख्या 1 हजार 200 हून अधिक झाली आहे. गुरुवारी सीआरपीएफच्या जवानांनी धारावीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्या भागासाठी तैनातीच्या योजनेवर चर्चा केली. तत्पूर्वी, बुधवारी रात्री केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी कडक बंदोबस्त लावण्यासाठी दक्षिण मुंबईतील भेंडी बाजारात फ्लॅग मार्च काढला.
मुंबई पोलीस दलातील 700 हून अधिक जवानांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि लॉकडाऊन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार रोखण्यासाठी केंद्रीय सैन्य मुंबई पोलिसांना मदत करणार आहे. दक्षिण आणि मध्य मुंबई, पूर्वेकडील आणि पश्चिम उपनगराच्या काही भागाला व्यापून टाकणार्या शहराच्या 1, 3, 5, 6 आणि 9 क्रमांकाच्या झोन्समध्ये केंद्रीय सैन्याच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.