मुंबई - आज(रविवार) जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत आहे. या निमित्त मध्य रेल्वेने लोकल, एक्सप्रेस आणि मालगाड्यांची जबाबदारी महिला कर्मचाऱयांकडे दिली. महिलांनीही आपली कामगिरी चोख बजावत त्यांच्यावर दाखवलेला विश्वास साध्य करुन दाखवला.
मुंबई-लखनऊ दरम्यान धावणारी पुष्पक एक्सप्रेस महिला चालकाने चालवली. या एक्सप्रेस गाडीमध्ये सर्व महिला कर्मचारी नेमण्यात आले होते. आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक आणि लोको पायलट (मेल) सुरेखा यादव यांनी ही पुष्पक एक्सप्रेस चालवली. त्यांच्यासोबत लोको पायलट संगीता सरकार, वरिष्ठ सहायक लोको पायलट आणि श्वेता घोने यांनी गार्डची जबाबदारी सांभाळली. या गाडीतील तिकीट तपासणीसाठी आणि आरपीएफ कर्मचारी देखील महिलाच होत्या.
हेही वाचा - जगाने झिडकारलं.. स्वतः यातना भोगणाऱ्या 'त्या' 'दामिनी'ने एड्सग्रस्तांसाठी उभी केली चळवळ
छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस ते कल्याण-27 ही लोकल कल्याणला 8 वाजून 58 मिनिटांनी रवाना झाली. या लोकलच्या चालक मुमताज़ काजी आणि गार्ड मयुरी कांबळे होत्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल लोकल सकाळी 9 वाजून 18 मिनिटांनी रवाना झाली. या गाडीच्या चालक मनीषा म्हस्के तर गार्ड सविता मेहता या होत्या. पहिल्यांदाच मध्य रेल्वेवर मालगाडी देखील महिला कर्मचाऱ्यांनी चालवली. मालगाडीच्या पहिल्या महिला चालक होण्याचा मान शिल्पीकुमारी तर गार्ड होण्याचा मान लीना फ्रान्सिस यांना लाभला.