मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ आणि पुणे विभागांत स्टेशन परिसरातील गरजू लोकांना सुमारे 1 हजार अन्नाची पाकिटे वाटली. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक आणि मुंबई सेंट्रल, मुंबई येथील आयआरसीटीसी बेस किचनमध्ये गरीब आणि गरजू लोकांसाठी जेवण (डाळ खिचडी) तयार केली जात आहे.
आरोग्यविषयक मानदंडांचे पालन करून खाद्यपदार्थांची सुमारे 2000 पाकिटे तयार केली जात असून वाणिज्यिक विभाग आणि आरपीएफमार्फत त्याचे वितरण केले जात आहे. याव्यतिरिक्त, कॅटरिंग स्टॉलमालक, वाणिज्य विभाग कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी अन्न पाकिटे वितरणात वैयक्तिक मदत करत आहेत.
नुकतेच सोलापूर विभागात खाद्यपदार्थांची 140 पाकिटे, नागपूर खाद्यपदार्थांची 150 पाकिटे, पुणे विभाग खाद्यपदार्थांची 150 पाकिटे, मुंबई विभाग व भुसावळ जवळपास खाद्यान्न 350 पाकिटे स्थानकांजवळील गरजू लोकांना वाटण्यात आली आहेत.
लातूर स्थानकात रक्तदान शिबिरदेखील आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये 45 जणांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदानानंतर सुरक्षित अंतर, स्वच्छता यासारख्या खबरदारी घेण्यात आल्या.