मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. भाजपाच्या रडारवर या दोन्ही पक्षाच्या नेते असून, शिवसेनेचे नेते अनिल परब, प्रताप सरनाईक, संजय राऊत, रवींद्र वायकर या सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही भ्रष्टाचार तसेच पदाचा गैरवापर केल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांकडून लावण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या रडारवर शिवसेना पक्ष काहीसा दूर होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भाजपच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केलेलं पाहायला मिळतं.
सध्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, एकनाथ खडसे यांच्यानंतर अजित पवार आणि नवाब मलिक या नेत्यांवर भारतीय जनता पक्षाकडून थेट आरोप केले जात आहेत.
नवाब मालिकांचा भाजपवर पलटवार -
गेल्या काही महिन्यापासून भारतीय जनता पक्षाने हा विकास आघाडी सरकारच्या नेत्यांना टार्गेट करत होते. सुरवातीला आरोप केलेले नेते हे बचावात्मक शैलीत दिसत असले तरी आता राष्ट्रवादीकडून देखील भाजप वर पलटवार करायला सुरुवात झाली आहे. एनसीबीने केलेल्या काही कारवाया चुकीच्या असून, या कारवाईच्यामागे भारतीय जनता पक्षाचे नेते असल्याचा थेट आरोप नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला. या आरोपाचे खंडन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले असले तरी, सध्या भाजपाचे नेते बचावात्मक शैलीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
हेही वाचा - माझ्या परिवाराची संपत्ती कुठे कुठे ते शोधा; कुणाच्या बापाला घाबरत नाही - मंत्री नवाब मलिकांचे आवाहन
भाजपकडून थेट पवार कुटुंब टार्गेट -
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यात झालेल्या कथित अपहारप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. अजित पवार यांच्या कुटुंबीयांची याबाबत सहा दिवस प्राप्तिकर विभागाने चौकशी केली. त्यानंतर दोन दिवस आधी पुणे आणि बारामतीमधील अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घराची झाडाझडती प्राप्तीकर विभागाकडून घेण्यात आली होती. पवार कुटुंबीयांवर होणारी कारवाई ही थेट शरद पवार यांना इशारा असल्याचे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केले आहे.
महाविकास आघाडी सरकारचे जनक हे शरद पवार आहेत. आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारला पाडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मात्र, यामध्ये भारतीय जनता पक्षाला आलेल्या अपयशानंतर केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आधी शिवसेना आणि त्यानंतर आता थेट पवार कुटुंबीयांना टारगेट केले जात आहे. या तपास यंत्रणेच्या माध्यमातून शरद पवारांना इशारा देण्यात येत आहे. तसेच राज्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या सर्व कारवायांचा काही फायदा होईल का? याबाबत देखील भारतीय जनता पक्षाचे चाचपणी सुरू असल्याचे मत अजय वैद्य यांनी व्यक्त केले आहे.
चंद्रकांत पाटलांची राष्ट्रवादीवर टीका -
राष्ट्रवादी काँग्रेस हा कधीही भरवशाचा पक्ष नव्हता. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा वेगवेगळ्या वेळी या पक्षाचे वेगवेगळे राजकारण पाहायला मिळते. एखाद्या वेळेस काँग्रेस पक्षावर भरवसा ठेवता येऊ शकतो. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसवर केव्हाही भरोसा ठेवता येऊ शकत नाही, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिमटा काढला आहे.
चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य मनावर घेण्यासारखं नाही -
चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनीदेखील त्यांना उत्तर देत, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य मनावर घेण्यासारखं नाही. ते झोपेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातच बोलतात, असा टोला जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. तसेच नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्यावर लावलेल्या आरोपाबाबत समीर वानखेडे उत्तर देतील. समीर वानखेडे यांच्यावर लावलेल्या आरोपांमुळे भारतीय जनता पक्ष का अस्वस्थ? असा खोचक प्रश्न जयंत पाटलांनी भाजपला लगावला आहे.