मुंबई - जागतिक महिला दिन मध्य रेल्वेच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय रेल्वेची प्रथम महिला लोको पायलट आणि आशियातील प्रथम महिला ट्रेन चालक सुरेखा यादव यांच्या नेतृत्वात सर्व महिला ट्रेन चालक एकवटल्या होत्या. तर महिला ट्रेन चालक सुरेखा यादव आणि मंजुळा इनामदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 02534 मुंबई- लखनऊ विशेष ही ट्रेन चालविण्यात आलेली आहे. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले असून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
महिलांनी चालवली लोकल -
प्रथम मोटरमन मुमताज काझी आणि उपनगरी गार्ड श्वेता घोणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८.४९ वाजता सुटणारी कल्याण लोकल चालवली तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ०९.०६ वाजता पनवेलकरीता सुटणारी उपनगरी गाडी मोटरवुमन मनीषा म्हस्के यांनी चालविली. या व्यतिरिक्त पनवेल ते कल्याणकडे जाणारी मालगाडी लोको पायलट तृष्णा जोशी, सहाय्यक लोको पायलट सुश्री सेल्वी नादर आणि गुड्स गार्ड कु. सविता मेहता यांनी चालविली. तर पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर विभाग आणि मध्य रेल्वेच्या कार्यशाळांमध्ये कोविड प्रोटोकॉलच्या सर्व नियमांचे पालन करून असेच उपक्रम राबविण्यात आले.
हेही वाचा - जाणून घ्या, राज्याच्या अर्थसंकल्पातून क्रीडा क्षेत्राला काय मिळणार?
महिला कर्मचार्यांना पुरस्कार -
मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक संजीव मित्तल यांनी कर्मचार्यांवर अवलंबून असलेल्या महिला पाल्यांना शिवणयंत्र, भुसावळ येथील रेल्वे शाळेतील महिला विद्यार्थ्यांना सायकल प्रशिक्षण देण्याकरिता सायकली आणि संगणक प्रशिक्षण व हलके मोटर वाहन चालविण्याचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या महिला रेल्वे कर्मचार्यांना प्रमाणपत्र वितरित केले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सभागृहात स्टाफ बेनिफिट फंड आणि रेल परिवार देख-रेख मोहीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात हे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. महाव्यवस्थापकांनी पात्र महिला कर्मचार्यांना पुरस्कारही प्रदान केले. याप्रसंगी महिला कर्मचार्यांनी आपले अनुभव उपस्थितांना सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित विविध उपक्रमांत वरिष्ठ अधिकारी यांच्यासह मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, शलभ गोयल यांनी पर्यवेक्षण केले.