मुंबई - सीबीएसई बोर्डाने दहावीच्या यंदाच्या परीक्षा रद्द करण्याचा अत्यंत योग्य स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. कोरोनाचा कहर वाढत असताना विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने ही निर्णय घेऊन राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
दहावी आणि बारावीची यंदा परीक्षा घेणे योग्य होणार नाही. कोरोनाच्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळून परीक्षा घेणे योग्य होणार नाही. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा उचित निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणेच राज्य सरकारने निर्णय घेऊन 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना वार्गोन्नती द्यावी, अशी सूचना आठवले यांनी केली आहे.
राज्य सरकारने ढकलल्या होत्या परीक्षा पुढे -
बारावीची परीक्षा मे महिन्यात, तर दहावीची परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहे. लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षांचे नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहितीही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्याचबरोबर, राज्य शासनाच्या मंडळाप्रमाणे इतर शिक्षण मंडळांनीही परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाचे पालन करावे, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले.
विद्यार्थ्यांचा विरोध कायम -
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा विरोध घेण्यात आला होता. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी आंदोलनदेखील केले होते.
राज ठाकरे यांनीदेखील केली होती प्रमोट करण्याची मागणी -
शाळा बंद आहेत, पण शाळांच्या फी तशाच आहेत. या शाळांना फी घेऊ नका, अर्धी घ्या किंवा काहीही करा. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा. ते कोणत्या मानसिकतेत आहेत, माहिती नाहीत. ही मुले तर लहान आहेत, कुठून अभ्यास करणार, कशा परीक्षा देणार, माहिती नाहीत, असे राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते