मुंबई : सीजीएसटीच्या भिवंडी आयुक्तालयातील अधीक्षकाला केंद्रीय अन्वेषण विभागानं लाच घेतल्याप्रकरणी अटक केलीय. हेमंत कुमार असं, या अधीक्षकाचं नाव आहे. एका कंपनीच्या प्रलंबित जीएसटी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी अधीक्षक हेमंत कुमारनं तक्रारदाराकडं 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. लाचेचा पहिला 5 लाख रुपयांचा हप्ता घेताना सीबीआयनं अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं. लाचखोर अधीक्षकाला न्यायालयानं 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं आहे.
लाचखोर अधीक्षक : कंपनीच्या प्रलंबित जीएसटी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी अधीक्षक हेमंत कुमारनं 30 लाख रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भातील तक्रार सीबीआयकडं करण्यात आली होती. त्यानुसार सीबीआयनं तपास सुरू केला. हेमंत कुमारनं 15 लाख रुपयांची मागणी करुन तक्रारदाराकडून तो लाचेचा 5 लाख रुपयांचा पहिला हप्ता घेणार होता. याची माहिती सीबीआयला मिळाल्यानंतर सीबीआयच्या पथकानं सापळा रचून हेमंत कुमारला अटक केली.
मालमत्तेची कागदपत्रे जप्त : सीबीआयनं हेमंत कुमारच्या मुंबई आणि गाझियाबाद येथील कार्यालय तसेच घराची झडती घेतली. त्यावेळी सीबीआय अधिकाऱ्यांना 42 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच स्थावर मालमत्तेशी संबंधित काही कागदपत्रं सापडली. सीबीआयनं जप्त केलेल्या ऐवजासह हेमंत कुमारला न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्याला 21 ऑगस्टपर्यत पोलीस कोठडीत पाठवलं आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी कुणाचा हात आहे का? याचा तपास सीबीआय करत आहे. लाच घेणं हा गुन्हा आहे, असं सांगणारे पोलीस अधिकारीच लाच घेत असल्याचं दिसत आहे. नाशिक आणि साताऱ्यात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पोलीस अधिकारीच लाच घेताना सापडले आहेत.
पोलीस उपनिरीक्षकास अटक : नाशिकरोड पोलीस ठाण्यातील निरीक्षक गणपत महादू काकड, याला विनयभंगाच्या गुन्ह्यातील संशयिताकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. नाशिकरोड पोलीस ठाण्यात एका पती,पत्नीनं परस्परविरोधी तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यातील तक्रारदारानं विनयभंगाचा आरोप केला होता. आरोपीला मदत करण्यासाठी गणपत काकड यानं त्याच्याकडं 25 हजाराची मागणी केली होती.
सहाय्यक फौजदाराला अटक : साताऱ्यातील खटाव तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं औंध पोलीस ठाण्याच्या सहाय्यक फौजदाराला १ लाख रुपयांची लाच घेताना पकडलं होतं. सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या वतीनं १ लाखाची लाच घेताना सहाय्यक फौजदार लाचेची रक्कम घेत होते.
हेही वाचा-