मुंबई : विवाहितेचा छळ झाल्याच्या घटना नेहमी घडत असतात. त्यांची कारणे देखील वेगवेगळी असतात. आता मुंबईतील भोईवाडा परिसरातील एका महिलेवर तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी शनिवारी तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने शुक्रवारी तक्रार घेऊन भोईवाडा पोलिस ठाण्यात संपर्क साधला. त्यावेळी ही धक्कादायक बाब उघडकीस आली, असे भोईवाडा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ : पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, महिलेचा नोव्हेंबर 2001 ते मे 2022 या कालावधीत तिचा पती, सासरे आणि पतीच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी छळ केला होता. त्याचप्रमाणे सासरच्या मंडळींनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने अखेर महिलेने पोलीस ठाणे गाठले. पीडितेने तिच्या पतीवर आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत. पोलीस त्यांची पडताळणी करत आहेत.
सासरच्या सहा जणांवर एफआयआर : पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, तिच्या सासूने तिच्यावर काळी जादू करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. भारतीय दंड संविधान कलम 323, 376(२) (एफ), 354 ए आणि 498अ अन्वये पीडित महिलेच्या सासरच्या सहा जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. भोईवाडा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. भोईवाडा पोलीस पीडित महिलेने केलेल्या आरोपांची पडताळणी करत आहे. आरोप केलेल्या सहा जणांची चौकशी करण्यात येणार आहे.
बारामतीतील घटना : माहेरहून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावून एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा वारंवार मानसिक शारीरिक छळ केल्याची घटना ऑक्टोबरमध्ये समोर आली होती. याप्रकरणी पतीसह सास, सासरा, दीर व जाऊ विरोधात पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिवसेंदिवस कौटूंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.