मुंबई - कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि पोलीस दिवसरात्र परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात नागरिकांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन करणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर गोवंडीत तिघांनी दगडफेक केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
उपनगरातील देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी 12 वाजेच्या सुमारास टाटा नगर येथे लोकांची गर्दी जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली. देवनार पोलीस तत्काळ ही गर्दी हटवण्यासाठी घटनास्थळी गेले. याठिकाणचा जमाव कमी करून पोलिसांची गाडी पुढे टाटानगर पाच नळ नाल्याच्या पुलाजवळ गोवंडी येथे गेली.
अचानक गाडीच्या समोरील काचेवर मोहम्मद इर्शाद खान (वय 18), फरहान शेख (वय 18) आणि एक अल्पवयीन मुलगा यांनी दगडफेक केली. यात गाडीच्या समोरील काचेचे नुकसान झाले. याप्रकरणी तिघांविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, कोविड 19 संसर्ग उपाययोजना आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान यासाठी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.