मुंबई: वांद्रे-वरळी सागरी सेतूवरुन उडी मारून आत्महत्या केलेल्या टिकम लक्ष्णमदास मखिजा (56) या व्यावसायिकाचा मृतदेह मंगळवारी दुपारी सापडला. दादर चौपाटीवर मखिजा यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. टिकम मखिजा हे खार भागातील व्यापारी होते.
पोलिसांची माहिती: सोमवारी एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी कारवरुन टिकम यांची ओळख पटवली. मिळालेल्या माहितीनुसार,सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एमएच 01- डीएक्स 0308 नोंदणी क्रमांकाच्या आय 20 या कारने टिकम वांद्रे वरळी सागरी सेतूवर पोहोचले. त्यांनी समुद्रात उडी मारली. टिकम यांनी आणलेली कार ही खुबचंदानी यांच्या नावावर होती. पोलिसांनी खुबचंदानी यांना संपर्क केला त्यानंतर उडी मारलेल्या व्यक्तीची ओळख पटली. ते कपड्यांचा व्यवसाय करत होते, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
काय म्हणाले खुबचंदानी: खुबचंदानी यांनी पोलिसांना माहिती दिली की, मखिजा यांचा 3 महिन्यांपूर्वी कलानगर उड्डाणपुलाजवळ अपघात झाला होता. त्यांना 8 दिवस हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. टिकम यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियेचा मोठा परिणाम झाला. त्यांना दररोज झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागत होत्या.
काल दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दादर चौपाटी येथील चैत्यभूमी परिसरातील किनाऱ्यावर माखिजा यांचा मृतदेह सापडला त्यानंतर सायन रुग्णालयात शवविच्छेदन केले गेले. मृतदेह शवविच्छेदनानंतर माखीजा यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आला. काल रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.- रवींद्र काटकर , परळी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
टिकम यांनी तणावातून आत्महत्या केल्याचा संशय- खुबचंदानीच्या म्हणण्यानुसार, रविवारी रात्री बहीण रितू आणि माखिजा त्यांच्या घरी आले होते. रात्री त्यांनी गप्पा मारल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी पहाटे साडेपाच वाजता टिकम माखिजा सिलिंकवर आले आणि समुद्रात उडी घेतली. माखिजा याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. टिकम यांनी समुद्रात उडी घेतल्याचे समजताच पोलिसांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसापासून अग्निशमन दल, तटरक्षक दल आणि नौदल माखिजाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. मंगळवारी नौसेनेच्या पथकाने मखिजा यांचा मृतदेह शोधला. टिकम यांनी तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
हेही वाचा-