नवी मुंबई - जम्बो कोविड सेंटरची निर्मिती करणे पराक्रम नाही. त्यासाठी तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्तीही आवश्यक आहे, अशी सूचना लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना केली आहे. नाईक यांनी कोरोना प्रतिबंध संबंधी आयुक्त बांगर यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी आणखी काही महत्त्वाच्या सूचना पालिका प्रशासनाला केल्या.
नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. देशातील इतर राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. इतर राज्यांमध्ये काम करत असलेले डॉक्टर, नर्सेस आणि इतर वैद्यकीय, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती राज्याच्या आरोग्य सचिवांमार्फत घेऊन कर्मचाऱ्यांची नियुक्ती नवी मुंबईतील विविध कोरोना सेंटरमध्ये करावी, असा सल्ला आयुक्तांना देण्यात आला.
कोरोना सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णावर योग्य ते उपचार होऊन तो बरा होऊन घरी परतेल, अशी आशा त्याच्या नातेवाईकांना असते. परंतु, अनेक वेळा कोरोना सेंटरमधील रुग्णाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. रुग्णांच्या प्राथमिक तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने हे रुग्ण ऑक्सिजनवर आणि त्यानंतर व्हेंटिलेटरवर जातात. कोरोना रुग्णांवर सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांकरिता स्वतंत्र मॉनिटरिंग व्यवस्था करण्याची मागणी नाईक यांनी केली. त्यांची ही मागणी आयुक्तांनी मान्यही केली.
वाशी येथील पालिका रुग्णालय कोरोनामुक्त करण्याची मागणी देखील नाईक यांनी केली होती. त्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाने आरंभली असून रुग्णालयाच्या २ मजल्यांवर बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. २१ सप्टेंबरपासून ओपीडीमध्ये रुग्ण तपासणीचे काम सुरू होणार आहे आणि सप्टेंबर अखेरपर्यंत हे रुग्णालय पूर्णपणे इतर सर्व आजारांवर उपचारासाठी खुले होणार आहे. खबरदारीचे पालन न करणे, मास्क न वापरणे, सॅनिटाईजरचा वापर न करणे अशा कारणांमुळे कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता जनहितासाठी जे लोक मास्क लावत नाहीत त्यांच्याकडून दंड वसुली करण्यास हरकत नाही, असे मतही नाईक यांनी यावेळी मांडले.
हेही वाचा- पनवेलमधील 'त्या' नॉन-कोविड गर्भवती माता प्रसूती केंद्रात जन्मले पहिले बाळ