मुंबई - नववर्षाच्या तोंडावर नव्या प्रकारच्या कोरोनाने आता भारतीयांची चिंता वाढवली आहे. कारण, भारतात आत्तापर्यंत नव्या विषाणूने बाधित असलेले सहा रुग्ण आढळले आहेत. ब्रिटनवरून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल आज विविध प्रयोगशाळांकडून सादर झाले आहेत. यात आतापर्यंत सहा जणांना नव्या प्रकारच्या कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. सुदैवाने या सहा जणांमध्ये महाराष्ट्रातील एकाचाही समावेश नाही.
राज्यातील 21 जणांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था, (एनआयव्ही) पुणे, या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या सर्व रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याने राज्याची धाकधूक कायम आहे. तर लवकरच आणखी 9 नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.
ब्रिटनमधून भारतात नव्या स्ट्रेनचा शिरकाव
काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने लंडनमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर सगळ्या जगाची डोकेदुखी या नव्या कोरोनाने वाढवली. भारताने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटन-भारत विमान सेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद केली. ब्रिटनसह युरोपातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावरच चाचणी करत त्या सर्वांना क्वारंटाइन करण्याचा मोठा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. याचा फायदा झाला असून ब्रिटनवरून आणि युरोपातून आलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तिथल्या तिथे शोधता येत असून त्यांना इतरांच्या संपर्कात येण्यापासून रोखता येत आहे. पण असे असले तरी आज मात्र भारताची चिंता वाढली आहे. कारण अखेर भारतात नव्या कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नव्या स्ट्रेनचे हे रुग्ण आहेत का? याची तपासणी करण्यासाठी देशातील 10 प्रयोगशाळेत जे नमुने पाठवले होते, त्या नमुन्यापैकी 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सहा जणांना नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे.
कठोर लॉकडाऊन टाळण्यासाठी स्वयंशिस्त पाळा - राजेश टोपे
महाराष्ट्रात ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूचा एकही रुग्ण सापडला नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 43 नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेनचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. रुग्णाचे स्वॅब पाठवण्यास हलगर्जीपणा झाला असेल तर जाब विचारू. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने इंग्लमधून येणाऱ्या सर्व फ्लाईट थांबवल्या असून प्रवाशांना इन्स्टिटय़ूशनल क्वारंटाईन करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.
नव्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा दर ७० टक्के आहे. त्यामुळे संसर्ग अधिक वेगाने होऊ शकतो. युरोप अमेरिकेसारखी कठोर लॉकडाऊन व्हायची वेळ येऊ नये, असे वाटत असले तर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे टोपे यांनी सांगितले.
हेही वाचा - चिंताजनक..! नव्या कोरोना विषाणूचे सहा रुग्ण भारतात सापडले
आतापर्यंत ब्रिटनहून आलेल्या 30 जणांना कोरोनाची लागण
भारतात सहा रुग्ण आढळले आहेत. सुदैवाने यात अजून तरी महाराष्ट्रातील रुग्ण नसल्याची माहिती डॉ. प्रदीप आवटे, राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. पण असे असले तरी राज्यात ब्रिटनहून आलेले 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील 21 जणांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत तर नऊ जणांचे नमुने लवकरच तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतरच राज्यातील चित्र स्पष्ट होईल, असेही ही डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, प्रयोगशाळेचा अहवाल थेट आयसीएमआरकडे जातो आणि मग त्यांच्याकडून त्या त्या राज्याला कळवण्यात येत आहे. त्यानुसार अजून तरी आपल्याला एकाही अहवालाबाबत कळवण्यात आलेले नाही. त्यामुळे 21 अहवालाची प्रतीक्षा अजून आहे असेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -'संपूर्ण जगाला कोरोनाची लस मिळेपर्यंत शांत बसणार नाही'
मुंबईतल्या 12 जणांचा समावेश
ब्रिटनवरून आतापर्यंत राज्यात 3 हजार 577 प्रवासी आले आहेत. यातील 1 हजार 980 जणांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी झाली आहे. यात 30 जण आतापर्यंत कोरोनाग्रस्त आढळले आहेत. या सर्व 30 जणांचे नमुने पुढील तपासणीसाठी अर्थात त्यांना नवा स्ट्रेन आहे का याची तपासणी करण्यासाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. यात मुंबईतील सर्वात जास्त 12 जणांचा समावेश आहे. तर पुण्यातील 3, ठाण्यातील 3 तर नागपूरचे 4 जण आहेत. औरंगाबाद आणि बुलढाण्यातील 2 तर नांदेड, नाशिक, रायगड आणि आणखी एका जिल्ह्यातील प्रवासी आहे.
चिंता वाढली आहे, पण घाबरू नका
देशात सहा रुग्ण नव्या स्ट्रेनचे आढळल्याने चिंता वाढली आहे. त्यातही महाराष्ट्राला जास्त चिंता आहे. कारण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने ब्रिटन आणि युरोपातून लोक येतात. विकसित राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राचा संबंध अधिकाधिक देशांशी येतो. त्यामुळे महाराष्ट्रात नव्या स्ट्रेनचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जे नियम आहेत त्याचे योग्य पालन होणे गरजेचे आहे असेही डॉ. आवटे यांनी सांगितले.