मुंबई - मुंबईमध्ये अनेक धोकादायक पूल उभे आहेत. त्यावरून दररोज लाखोजण प्रवास करतात. या पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र पूल विभागातील तांत्रिक काम पाहणारे सर्वच अभियंते निवडणूक कामाला गेल्याने ही कामे पुढील दोन- तीन महिने रखडणार आहे. त्यामुळे मुंबईकरांवर धोकादायक पुलांची टांगती तलवार कायम राहिली आहे.
सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक पुलांचे ऑडिट, दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हिमालय पूल दुर्घटनेनंतर ऑडिट, दुरुस्ती, तपासणी ही कामे आता वेगाने होतील असे म्हटले गेले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पूल विभागातील ५५ अभियंत्यांपैकी ५४ अभियंत्यांना निवडणुकीच्या कामाला लावले आहे. यात १ - मुख्य अभियंता, ६ कार्यकारी अभियंता, ९ सहाय्यक अभियंता, ३८ दुय्यम अभियंता, १ ज्युनियर अभियंता अशा ५४ अभियंतांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे ऑडिट, दुरुस्ती व देखभालीचे काम रखडणार आहे. मुंबईत एकूण १८ धोकादायक पूल असून ४ खासगी तर १४ पालिकेचे पूल आहेत. पालिकेच्या अखत्यारित असणाऱ्या १४ पुलांपैकी ७ पूल पाडण्यात आले आहेत. तर उर्वरित ७ पूल लवकरच पाडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
मरिन लाईन्स पुलाचे काम रखडले -
धोकादायक झालेला मरिन लाईन्स स्थानकाजवळचा पूल पाडून त्याच्या बांधकामासाठी निविदाही काढण्यात आली. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने आता या निविदा प्रक्रिया निवडणुकीनंतर होणार आहे. शिवाय पाडलेल्या पुलाखाली उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात आहे. या विद्युत वाहिनीतून पश्चिम रेल्वेला वीजपुरवठा केला जातो. पुलासाठी खोदकाम करताना केबलला काही झाल्यास वीजपुरवठा खंडित होईल. त्यामुळे पुलाचे काम सुरु केल्यानंतरही केबलची विशेष काळजी घेऊनच काम सुरु केले जाईल, असे एका अधिकाऱयांनी सांगितले.